Wednesday, 1 July 2020

'चला पंढरीसी जाऊ ।' - आषाढी वारी भाग २



'चला पंढरीसी जाऊ'
      - प्रा. डॉ. महेश नारायण गायकवाड

उन्हाच्या तडाख्याने भाजून निघालेल्या धरणीला शितल करणाऱ्या मृगाचे मेघ आकाशात दाटू लागले आणि पावसाच्या सरीने धरती तृप्त होऊ लागली की, त्या सावळ्या ढगांकडे पाहताना महाराष्ट्रातील भाविक शेतकऱ्याच्या मनामध्ये पंढरीच्या 'सावळ्या विठु' ची ओढ अनावर होऊ लागते. 'तुजलागी माझा जीव झाला पिसा' अशी त्याच्या भेटीची आस मनाला लागते आणि त्याच्याही नकळत पाऊले पंढरीची वाट चालू लागतात. असे लाखो भाविक एकत्र येतात आणि मग निघते ती महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असणारी, सातशे वर्षांपेक्षाही जुना इतिहास सांगणारी दिंडी, म्हणजेच पंढरीची वारी. हा भक्तीचा सोहळा एकदा तरी अनुभवावा असाच असतो.
एक साधा मोर्चा किंवा एक मिरवणूक काढायची असेल तर संयोजकाला नियोजन करता करता तोंडाला फेस येतो. इथं मात्र कोणाच्याही विनंती शिवाय, कोणाच्याही निमंत्रणाशिवाय, आत्मप्रेरणेने ईश्वर भक्तीची वाट चालणारे लाखो वारकरी एकत्र येतात, परस्परांना भेटतात, एकमेकांचे सखेसोबती होतात आणि त्यातून साकारतो एक अफाट जनसमुदाय. कोणी या म्हणणारे नाही, कोणी थांबा म्हणणारे नाही, कोणी शिस्त लावणारे नाही. पण एका स्वयंशिस्तीने साऱ्या अडचणी सोसत, ऊन, वारा, पाऊस, थंडी कशाचीही पर्वा न करता चालणारा तो जनसागर पाहून अचंबित व्हायला होतं. स्वतःच्या आनंदात चालणारा वारकरी त्यात अशिक्षित, सुशिक्षित, शेतकरी, मजूर, व्यापारी, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर सारे-सारे असतात. पण इथे मात्र ते असतात फक्त वारकरी. साऱ्यांच्या हृदयातून एकच विठ्ठल भक्तीचा प्रवाह वाहत असतो.
इतके धर्म, इतके पंथ अमाप असताना, महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाला जी अफाट लोकप्रियता मिळाली ती कोणत्याही संप्रदायाला मिळालेली नाही. याला कारण सामान्य माणसाशी या संप्रदायाचे असणारे जिव्हाळ्याचे नाते. उत्कट भक्ती, सदाचार, नीती शिकवणारा साधा सरळमार्गी हा आचारधर्म. 'नाचू कीर्तनाचे रंगी  ज्ञानदीप लावू जगी ' असे भजन-कीर्तन, हरिजागर याव्यतिरिक्त इथे कुठलेही कर्मकांड नाही. इथं कुणीही यावं आणि ईश्वर भक्तीत रंगून जावं. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकोबाची गाथा ही या पंथाची प्रस्थानत्रयी. हे तीन ग्रंथ हृदयाशी धरावेत, पारायणे करावीत! पंढरीची वारी ही इथली एकमेव साधना. 'भावाचा भुकेला' असणाऱ्या ईश्वराचे नाम हा इथला पाचवा वेद! आणि भक्ती हा इथला पाचवा पुरुषार्थ! गळ्यातील तुळशीची माळ हीच अलंकार भूषणे! असा हा सामान्य माणसांचा असामान्य संप्रदाय! 
'पंढरी' आणि 'विठ्ठल' या दोन शब्दांनी वारकऱ्यांचे मन रोमांचित होते. 'जेव्हा नव्हते चराचर  तेव्हा होते पंढरपूर ' अशी वारकऱ्यांची टोकाची श्रद्धा असते. काही श्रद्धा 'शुभंकर' असतात. त्या आपले जीवन सुंदर करतात आणि त्यांचे अस्तित्व आपल्या मनाला आधार देते अशीच ही सुंदर श्रद्धा आहे. विठ्ठल हा वारकऱ्यांच्या 'जिविचे जीवन' आहे. म्हणूनच पंढरी त्याला आपले माहेर वाटते. चराचरात भरून राहिलेल्या परमेश्वराचे अस्तित्व मान्य करूनही 'सावळ्या सुंदरा'च्या दर्शनाची त्याची इच्छा कमी होत नाही आणि वारकरी तुकोबांच्या शब्दात गाऊ लागतात...
चला पंढरीसी जाऊ । रखमादेवीवरा पाहूं।।
डोळे निवतील कान । मना तेथे समाधान।।
संत महंता होतील भेटी । आनंदे नाचो वाळवंटी।।
तें तीर्थाचे माहेर । सर्व सुखाचे भांडार ।।
जन्म नाही रे आणीक । तुका म्हणे माझी भाक ।।  
आणि मग गावोगावावरून दिंड्या निघू लागतात. शेकडो मैलांचा प्रवास करून जाणाऱ्या या पालखी सोहळ्याला 'दिंडी' हेच नाव शोभते. 'दिंडी' या शब्दाचे तीन अर्थ आहेत. 'दिंडी' म्हणजे भागवत धर्माची भगवी पताका, 'दिंडी' म्हणजे छोटी 'विणा' जी वारकऱ्यांच्या पुढे असते. त्या विणेचा मान मोठा असतो. तीच्यामागून सारी दिंडी चालते. आणि तिसरा अर्थ 'दिंडी' म्हणजे छोटा दरवाजा. वारकऱ्यांना खात्री असते की या 'दिंडी'तून जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले की आपल्यासाठी विठुराया कडे घेऊन जाणारा 'दिंडी दरवाजा' नक्की उघडेल! म्हणूनच ही यात्रा एका देवाची, एका मंदिराची किंवा एका गावाची नाहीही यात्रा आहे एका श्रद्धेच्या थोर परंपरेची एका संस्कृतीची!
या दिंडीतून चालणारे आपल्याच जातीचे विठ्ठल वेडे पाहून वारकऱ्यांचे मन आनंदाने भरून येते. विठ्ठलाच्या जोडीने तिथे भेटणार्‍या संतांचे दर्शन हा ही आनंद सोहळाच असतो. त्या संत दर्शनाने विठ्ठल भेटल्याचाच आनंद होतो. खांद्यावर भगवी पताका घेऊन, कपाळी टिळा लावून, ग्यानबा-तुकारामाचा आणि विठ्ठल नामाचा गजर करीत बेभान होऊन नाचणारे हे वारकरी नाना जाती-धर्माचे असतात पण अवघे कूळ-जाती-वर्ण विसरून फक्त एका विठ्ठल भक्तीच्या सूत्रात ओवलेले माळकरी होऊन जातात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्ञानोबा-तुकोबाच्या पाउलखुणा शोधत आलेले हे वारकरी दर आषाढी कार्तिकीच्या वारीला एकमेकांना भेटतात यांना विठ्ठल भेटल्याचाच आनंद होतो.
          'आत विठ्ठलु, बाहेर विठ्ठलु। मिची विठ्ठलु मज भासतसे।' अशा देहभान विसरायला लावणाऱ्या अवस्थेमध्ये '...माऊली... माऊली...!' अशी एकमेकांना साद घालत ज्यावेळी परस्परांना क्षेम-आलिंगन देतात त्या वेळी वाटते पंढरी च्या वाटेने निघालेला प्रत्येक वारकरी स्वतःला विठ्ठल स्वरूप आहे.
मग वाटू लागते अशा भक्तीने भारावलेल्या वातावरणात तो विठ्ठल तरी मंदिरात कसा राहू शकेल? अशा आनंदाचा आस्वाद घेण्यासाठी तोही कधीच मंदिरातून बाहेर पडला असावा! आणि या सार्‍या लाखो वारकऱ्यांच्यामध्ये तोही या रंगी रंगला असावा! तोही कदाचित गात असावा...
        "आनंदु रे आजी आनंदु रे। सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदु रे।"

Tuesday, 30 June 2020

‘प्रेम विटेवरी देखियले।’ - आषाढी वारी भाग १


 प्रेम विटेवरी देखियले।’

             -  प्रा. डॉ. महेश नारायण गायकवाड

            आषाढ महिना सुरु झाला की, महाराष्ट्राला वेध लागतात पंढरीच्या वारीचे. वारकऱ्यांचा जीव त्या सावळ्याच्या दर्शनासाठी व्याकुळ होऊ लागतो आणि माझे जिवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी। अशा भारावलेल्या अवस्थेत साऱ्या महाराष्ट्रातून भक्तजन-वारकरी पंढरपुरात दाखल होऊ लागतात. ‘जाईन गे माये तया पंढरपुरा। भेटेन माहेरा आपुलिया।’ असा माहेरवाशीण स्त्रियांच्या चेहऱ्यावरचा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो.  पंढरीला जाणे किंवा जाण्याची ओढ लागणे हे सहजी होत नाही. ‘सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन। क्षेम मी देईन पांडुरंगी।’ असे ज्ञानदेवांनी उगीच सांगितले नाही.
 चंद्रभागा ही वारकऱ्यांची दक्षिणगंगा आणि पंढरपूर ही दक्षिणकाशी ! श्री विठ्ठल हे त्यांचे ‘परमदैवत’. ‘आड  वाहे भीमा। तारावया देह आत्मा।’ अशा पुण्यसलिला भिवरेच्या काठी ‘सुदर्शन’ ठेवून स्वतः श्रीहरीने हे महाक्षेत्र उभे केले आहे अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे.
रूपपाहता लोचनी। सुख झाले वो साजनी।
तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा।।
अशा विठ्ठलाच्या ‘क्षेमालागी’ वारकऱ्यांचा जीव ‘उतावीळ’ होतो. त्यासाठी त्यांचे बाहू स्फुरत असतात. विठोबा हेच त्यांचे सारसर्वस्व आहे. ‘सकळही गोत माझे पंढरीसी जाण।’ ही वारकऱ्यांची भावना आहे. या गणगोतांना भेटण्यासाठी जीवाला लागलेली ती ओढ असते.
          शांती भीमातीरी भक्ती पंढरपुरी।
          
प्रेम विटेवरी देखियले।।
असा विठ्ठल प्रेमाचा साक्षात्कार नामदेवांना झाला होता. त्याला प्रेमाने पहावे, प्रेमाने भेटावे, त्या साक्षात प्रेमाला प्रेमाने आलिंगन द्यावे आणि स्वतः प्रेमरूप व्हावे असे हे विटेवर उभे असलेले साक्षात प्रेम आहे! पांडुरंगाच्या या स्वरूपाची मोहिनी सार्‍याच संतांना पडली आहे. म्हणूनच त्यांनी या चैतन्यमय ‘विश्वसौंदर्याची’ पूजा अभंग रूपातल्या ‘अक्षरसौंदर्याने’ बांधली आहे.
            भक्ती प्रेमाचा साक्षात्कार देणारा भागवत संप्रदाय भोळ्याभाबड्या भक्तांच्या प्रेमाचा साक्षात्कार असला तरी, या वारकरी संप्रदायाचे वैचारिक अधिष्ठान असणारा मूळ विचार मात्र साऱ्या विश्वाला कवेत घेऊ शकणारा समतेचा, बंधुतेचा विचार आहे! शेकडो वर्षांपासून वारकऱ्यांनी जपलेली ही 'अध्यात्मिक लोकशाही' आहे. भागवत धर्माची परंपरा ज्ञानदेवांच्याही पुर्वीची आहे. परंतु वारकरी परंपरेचा जिवंत चळवळ म्हणून आरंभ खऱ्या अर्थाने ज्ञानदेव-नामदेव हाच आहे. बहुजन समाजाने आणि अठरापगड जातींनी ज्ञानदेव-नामदेव-तुकोबा यांना आपल्या हृदयाशी धरले. कारण त्यांच्या मनातला सल आणि त्यांची विषमतेची व्यथा वारकरी संप्रदायाने जाणली होती. ही भेदाची आणि असमानतेची वागणूक वारकरी संप्रदायाने पहिल्यांदा झुगारून टाकली.
            भगवद्गीतेने याबाबतीत वेदांच्या परंपरेपेक्षा वेगळे एक पाऊल टाकले खरे पण ज्ञानदेव-नामदेवांनी तो विचार वास्तवात आणला. वेद ज्ञानाच्या बाबतीत कितीही समृद्ध असले तरी त्यांनी ज्ञानाचा अधिकार फक्त त्रैवर्णिकांना देऊन आपले वृत्तीचे कर्पण्य दाखवले आहे. या भेदामुळे समाजातल्या मोठ्या वर्गावर अन्याय झाला आहे हे ज्ञानदेवांनी जाणले आणि रोख-ठोकपणे ते सांगितलेही.
            वेदु संपन्न होये ठायी। परी कृपणु ऐसा आन नाही।
           जो कानी लागला तिही। वर्णांचीया।।
            जन्माधिष्ठित समाज रचनेमुळे आलेली आत्महीनतेची भावना समूळ निपटून काढून त्याला आत्मभान देण्याचा आणि त्यांचा आत्मप्रत्यय जागृत करण्याचा चमत्कार ज्ञानदेवांनी केला. या जागृतीतून सावतामाळी, गोरा कुंभार, चोखामेळा, सेनान्हावी, कान्होपात्रा, जनाबाई अशी अठरापगड जातीतील संतांची मालिका निर्माण झाली आणि वारकरी संप्रदायाची चळवळ झाली! त्याला विद्रोहाची धार चढवत तुकोबांनी 'भेदाभेदभ्रम अमंगळ' अशी घोषणा करीत समतेचा आणि ममतेचा संदेश दिला आणि एक सामाजिक क्रांती घडवली!
            या परंपरेत वाढलेल्या वारकऱ्याला देव मूर्तीत नाही, तो अंतरात आहे याची मनोमन खात्री असते. म्हणून तर आषाढीला विठ्ठलाच्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन नाही झाले तरी तो कळसाचे दर्शन घेऊन माघारी फिरेल. पण मात्र समोर दुसरा वारकरी आला की, 'प्रथम भेटी अलींगण मग वंदावे चरण' असे त्याच्यातल्या ‘चैतन्यतत्वाला’ आलिंगन आणि ‘ईश्वरतत्त्वाला’ वंदन पायावर डोके ठेवून करेल! हीच तर वारकरी परंपरा आहे. सकळ प्राणीमात्रांवर प्रेमआत्मतत्वाचा साक्षात्कारपवित्र विचारसात्विक आचार हीच वारकरी संप्रदायाची खरी ओळख! आषाढी कार्तिकीला पंढरीला जायचे ते देव भेटण्यासाठी नाही, तर असे संत भेटण्यासाठी आणि संत सहवासात देव कळण्यासाठी!  
                                              

Monday, 8 June 2020

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे जयंती अभिवादन

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर चे  संकल्पक, संस्थापक 
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे 
यांच्या १०२व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.