Tuesday, 30 June 2020

‘प्रेम विटेवरी देखियले।’ - आषाढी वारी भाग १


 प्रेम विटेवरी देखियले।’

             -  प्रा. डॉ. महेश नारायण गायकवाड

            आषाढ महिना सुरु झाला की, महाराष्ट्राला वेध लागतात पंढरीच्या वारीचे. वारकऱ्यांचा जीव त्या सावळ्याच्या दर्शनासाठी व्याकुळ होऊ लागतो आणि माझे जिवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी। अशा भारावलेल्या अवस्थेत साऱ्या महाराष्ट्रातून भक्तजन-वारकरी पंढरपुरात दाखल होऊ लागतात. ‘जाईन गे माये तया पंढरपुरा। भेटेन माहेरा आपुलिया।’ असा माहेरवाशीण स्त्रियांच्या चेहऱ्यावरचा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो.  पंढरीला जाणे किंवा जाण्याची ओढ लागणे हे सहजी होत नाही. ‘सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन। क्षेम मी देईन पांडुरंगी।’ असे ज्ञानदेवांनी उगीच सांगितले नाही.
 चंद्रभागा ही वारकऱ्यांची दक्षिणगंगा आणि पंढरपूर ही दक्षिणकाशी ! श्री विठ्ठल हे त्यांचे ‘परमदैवत’. ‘आड  वाहे भीमा। तारावया देह आत्मा।’ अशा पुण्यसलिला भिवरेच्या काठी ‘सुदर्शन’ ठेवून स्वतः श्रीहरीने हे महाक्षेत्र उभे केले आहे अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे.
रूपपाहता लोचनी। सुख झाले वो साजनी।
तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा।।
अशा विठ्ठलाच्या ‘क्षेमालागी’ वारकऱ्यांचा जीव ‘उतावीळ’ होतो. त्यासाठी त्यांचे बाहू स्फुरत असतात. विठोबा हेच त्यांचे सारसर्वस्व आहे. ‘सकळही गोत माझे पंढरीसी जाण।’ ही वारकऱ्यांची भावना आहे. या गणगोतांना भेटण्यासाठी जीवाला लागलेली ती ओढ असते.
          शांती भीमातीरी भक्ती पंढरपुरी।
          
प्रेम विटेवरी देखियले।।
असा विठ्ठल प्रेमाचा साक्षात्कार नामदेवांना झाला होता. त्याला प्रेमाने पहावे, प्रेमाने भेटावे, त्या साक्षात प्रेमाला प्रेमाने आलिंगन द्यावे आणि स्वतः प्रेमरूप व्हावे असे हे विटेवर उभे असलेले साक्षात प्रेम आहे! पांडुरंगाच्या या स्वरूपाची मोहिनी सार्‍याच संतांना पडली आहे. म्हणूनच त्यांनी या चैतन्यमय ‘विश्वसौंदर्याची’ पूजा अभंग रूपातल्या ‘अक्षरसौंदर्याने’ बांधली आहे.
            भक्ती प्रेमाचा साक्षात्कार देणारा भागवत संप्रदाय भोळ्याभाबड्या भक्तांच्या प्रेमाचा साक्षात्कार असला तरी, या वारकरी संप्रदायाचे वैचारिक अधिष्ठान असणारा मूळ विचार मात्र साऱ्या विश्वाला कवेत घेऊ शकणारा समतेचा, बंधुतेचा विचार आहे! शेकडो वर्षांपासून वारकऱ्यांनी जपलेली ही 'अध्यात्मिक लोकशाही' आहे. भागवत धर्माची परंपरा ज्ञानदेवांच्याही पुर्वीची आहे. परंतु वारकरी परंपरेचा जिवंत चळवळ म्हणून आरंभ खऱ्या अर्थाने ज्ञानदेव-नामदेव हाच आहे. बहुजन समाजाने आणि अठरापगड जातींनी ज्ञानदेव-नामदेव-तुकोबा यांना आपल्या हृदयाशी धरले. कारण त्यांच्या मनातला सल आणि त्यांची विषमतेची व्यथा वारकरी संप्रदायाने जाणली होती. ही भेदाची आणि असमानतेची वागणूक वारकरी संप्रदायाने पहिल्यांदा झुगारून टाकली.
            भगवद्गीतेने याबाबतीत वेदांच्या परंपरेपेक्षा वेगळे एक पाऊल टाकले खरे पण ज्ञानदेव-नामदेवांनी तो विचार वास्तवात आणला. वेद ज्ञानाच्या बाबतीत कितीही समृद्ध असले तरी त्यांनी ज्ञानाचा अधिकार फक्त त्रैवर्णिकांना देऊन आपले वृत्तीचे कर्पण्य दाखवले आहे. या भेदामुळे समाजातल्या मोठ्या वर्गावर अन्याय झाला आहे हे ज्ञानदेवांनी जाणले आणि रोख-ठोकपणे ते सांगितलेही.
            वेदु संपन्न होये ठायी। परी कृपणु ऐसा आन नाही।
           जो कानी लागला तिही। वर्णांचीया।।
            जन्माधिष्ठित समाज रचनेमुळे आलेली आत्महीनतेची भावना समूळ निपटून काढून त्याला आत्मभान देण्याचा आणि त्यांचा आत्मप्रत्यय जागृत करण्याचा चमत्कार ज्ञानदेवांनी केला. या जागृतीतून सावतामाळी, गोरा कुंभार, चोखामेळा, सेनान्हावी, कान्होपात्रा, जनाबाई अशी अठरापगड जातीतील संतांची मालिका निर्माण झाली आणि वारकरी संप्रदायाची चळवळ झाली! त्याला विद्रोहाची धार चढवत तुकोबांनी 'भेदाभेदभ्रम अमंगळ' अशी घोषणा करीत समतेचा आणि ममतेचा संदेश दिला आणि एक सामाजिक क्रांती घडवली!
            या परंपरेत वाढलेल्या वारकऱ्याला देव मूर्तीत नाही, तो अंतरात आहे याची मनोमन खात्री असते. म्हणून तर आषाढीला विठ्ठलाच्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन नाही झाले तरी तो कळसाचे दर्शन घेऊन माघारी फिरेल. पण मात्र समोर दुसरा वारकरी आला की, 'प्रथम भेटी अलींगण मग वंदावे चरण' असे त्याच्यातल्या ‘चैतन्यतत्वाला’ आलिंगन आणि ‘ईश्वरतत्त्वाला’ वंदन पायावर डोके ठेवून करेल! हीच तर वारकरी परंपरा आहे. सकळ प्राणीमात्रांवर प्रेमआत्मतत्वाचा साक्षात्कारपवित्र विचारसात्विक आचार हीच वारकरी संप्रदायाची खरी ओळख! आषाढी कार्तिकीला पंढरीला जायचे ते देव भेटण्यासाठी नाही, तर असे संत भेटण्यासाठी आणि संत सहवासात देव कळण्यासाठी!  
                                              

Monday, 8 June 2020

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे जयंती अभिवादन

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर चे  संकल्पक, संस्थापक 
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे 
यांच्या १०२व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.