Tuesday, 28 September 2021
ल(य)ता(ला) चा सुरेल प्रवास ! लतादीदी अभिष्टचिंतन ! डॉ. महेश गायकवाड
Sunday, 5 September 2021
शिक्षक दिनानिमित्त गुरूवंदन 🙏💐
Friday, 3 September 2021
पुरोगामी विचारवंत: संत सेना महाराज
पुरोगामी विचारवंत: संत सेना महाराज
प्रा. डॉ. महेश नारायण गायकवाड, (मो.- 8208835510)
(लाल बहादूर शास्त्री कॉलेज, सातारा)
महाराष्ट्राची भूमी जशी राष्ट्र घडवणाऱ्या वीरांची आहे, देशाला दिशा देणाऱ्या समाजसुधारकांची आहे तशीच ती मनामनात भक्तीचा मळा फुलवून, मानवतेला गळ्याशी धरणाऱ्या संतांचीही आहे. संत साहित्य ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची ओळख आहे. संत साहित्य हे आपल्या जगण्याचे, विचारांचे, बोलण्याचे अभिन्न अंग आहे. इतके अभिन्न की, बऱ्याचदा एखादे उदाहरण, एखादा दाखला आपण संत साहित्यातला देतो आहोत, हे देखील आपल्या लक्षात येत नाही. संत साहित्याचा अभ्यास अनेक अंगांनी करता येतो. आशयाच्या अंगाने, भक्तिमार्गाच्या अंगाने, साहित्यशास्त्रीय दृष्टिकोनातून, काव्य सौंदर्याच्या अंगाने, इ. परंतु आज संत साहित्याचा विचार विवेकवादी आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून करणे जास्त आवश्यक आहे. वारकरी संप्रदायाने समाजाला नेहमीच मानवतावादाच्या दिशेने घेऊन जाण्याचे प्रयत्न केलेले आहेत. त्याचा मागोवा घेत राहणे, हीच आजच्या काळाची गरज आहे. येत्या ४ सप्टेबरला तिथीनुसार संत सेना महाराजांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त सेना महाराजांच्या जीवनचरित्राचा आणि साहित्याचा मागोवा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून या लेखात घेतला आहे.
संत सेना महाराज : चमत्कार कथा
संत सेना महाराजांची महाराष्ट्राला आजही असलेली ओळख म्हणजे एक चमत्कार कथा; आणि एक अभंग एवढीच आहे. चमत्कार कथा अशी : बांधवगडच्या राजाकडे नाभिक म्हणून सेवेत असणाऱ्या सेनाजींना एक दिवस घरी आलेल्या संत-सज्जनांची सेवा करता करता राजाकडे जायला उशीर झाला. राजांनी सेनांना निरोप पाठवला. सेनाजी म्हणाले, “संतांची सेवा आटोपून येतो.” परंतु या निरोपाचा काही हितशत्रूंनी विपर्यास करून राजाला सांगितला. राजाला तो स्वत:चा उपमर्द वाटला. राजा क्रोधित झाला. तो सेनाजींना काही शिक्षा करणार हे लक्षात आल्याने, स्वत: परमेश्वर सेनाच्या रूपात आला आणि त्याने राजाची नित्यकर्मे केली. ही ती चमत्कार कथा! आणि दुसरे, त्यांनी लिहिलेला ‘आम्ही वारीक वारीक ।’ हा अभंग. एवढीच त्यांची ओळख बहुतेकांना असते ! परंतु यामुळे यापलीकडे सेना महाराजांचे समाज प्रबोधनाचे जे फार मोठे कार्य आहे, त्याकडे मात्र दुर्लक्ष होते किंवा केले जाते, हे वास्तव आहे. पांडुरंगाने सेना महाराजांच्या रूपात येऊन त्यांचे कर्म केले, या आणि अशाच आशयाच्या चमत्कार कथा अन्य संतांच्या चरित्रातही आढळतात. परमेश्वराने जनाबाईसाठी घरकाम केले, केर काढला, गोरोबांना, चोखोबांना त्यांच्या त्यांच्या कार्यात मदत केली. या सर्व चमत्कार कथा या मिथककथा आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. यातील आशय इतकाच की, जनमानसात हलकी समजली जाणारी ही कामे प्रत्यक्ष परमेश्वरसुद्धा मनात कोणताही किंतु न बाळगता आनंदाने करतो. त्यामुळे असे काम करणारे त्यांच्या व्यवसायामुळे हलके किंवा शूद्र होऊ शकत नाहीत. उलट अशा कर्मप्रधान जीवन जगणाऱ्या आणि कारागिरीचे काम करणाऱ्या संतांबद्दल आणि सर्वांबद्दल आदरच बाळगला पाहिजे, हाच संदेश ही कथा देते.
जीवन चरित्र परिचय
अहमदाबाद-जबलपूर रेल्वे मार्गावरील कटनी रेल्वे जंक्शनपासून इशान्येला अठरा मैलांवर असलेल्या बांधवगड येथे सेनाजींचा जन्म शके १२२३ (इ. स. १३०१) मिती वैशाख वद्य द्वादशी रोजी झाला. बांधवगड येथे राजा रामसिंगांचे राज्य होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजावीर सिंह गादीवर बसले. सेनाजींचे वडील या राजघराण्याचे परंपरागत नाभिक होते. सेनाजींचे वडील देविदास व आई प्रेमकुंवरबाई हे दोघेही सत्शील, धार्मिक वृत्तीचे होते. वडील देविदास हे उत्तर भारतातील थोर संत रामानंद यांचे शिष्य होते. रामानंद यांचे त्यांच्या घरी येणेजाणे असे. देविदास आपले गुरू रामानंद यांच्याशी तात्त्विक व आध्यात्मिक विषयांवर चर्चा करीत असत. सेनाजी त्या चर्चा ऐकत असत. सेनाजींची बुद्धिमत्ता, ग्रहणक्षमता, चातुर्य पाहून गुरु रामानंद यांनी सेनाजींचा शिष्य म्हणून स्वीकार केला.
वडिलांच्या वृद्धापकाळामुळे त्यांची राजदरबारातील सेवा सेनाजींनी पुढे चालू ठेवली. आपल्या विहित कार्याविषयी अत्यंत निष्ठा, कार्यात तन्मयता व तत्परता यामुळे सेनावर राजाचे विशेष प्रेम होते. सेनाजी आपले नाभिक कर्म रोज दोन प्रहरापर्यंत करीत असत. त्यानंतर मात्र ते आपल्या व्यवसायाच्या धोकटीला हातही लावीत नसत. त्यानंतर स्नान भोजन करून ते परमेश्वराचे नामस्मरण आणि आध्यात्मिक चिंतन यात उर्वरित सर्व दिवस व्यतित करीत असत. सेनाजींची पत्नी सुंदराबाई या नावाप्रमाणे सुंदर, सालस आणि भक्तीबाबत सेनाजीना साथ देणाऱ्या होत्या.
सेनाजींची भाविक वृत्ती, संतवृत्ती आणि त्यांचा अधिकार ओळखून राजाने सेनाजींचे शिष्यत्व पत्करले. त्या दिवसापासून ते सेना महाराज झाले. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. ते संत पुरुष म्हणून ओळखले जाऊ लागले. मुळात संत हे जातीपातीच्या बंधनांच्या पलीकडे गेलेले असतात. ते सर्व मानवसमूहाचे दीपस्तंभ असतात. ‘जाती-पाती पुछे ना कोय, हरि को भजे सो हरि का होय.’ या संत कबीराच्या दोह्याप्रमाणे सेनाजी हे कोणत्या एका जातीचे संत नाहीत तर ते वारकरी संप्रदायाचे आणि पर्यायाने मानवकल्याणाची अभिलाषा बाळगणाऱ्या सर्व मानवांसाठी वंदनीय संत आहेत.
संत ज्ञानेश्वर यांचे वडील विठ्ठलपंत आणि सेना महाराजांचे वडील देविदास हे दोघेही गुरुबंधू; गुरु रामानंदांचे शिष्य आणि परस्परांचे स्नेही होते. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव आणि भावंडे शुद्धिपत्र मिळविण्याकरिता *काशी*ला आल्याची; आणि त्यांच्या तिथल्या ब्रह्मवृंदांसोबत घडलेल्या घटनेबद्दलची चर्चा संपूर्ण परिसरात होत असे. ते सेनाजींच्या वडिलांनी ऐकलेले होते. त्यामुळे त्यांनी सेनाजींच्याकडे इच्छा व्यक्त केली की, ‘तू महाराष्ट्रात जाऊन या भावंडाना भेटावेस, असे मला वाटते.’ सेनाजींचा ओढा पंढरपूर आणि विठ्ठलाकडे आधीपासूनच होता. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राची तीर्थयात्रा करण्याचा निर्णय घेतला. आणि ते बाहेर पडले. महाराष्ट्रात ते दीर्घकाळ राहिले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण उत्तर भारतात भ्रमंती केली आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात वृद्धावस्थेत ते पुन्हा बांधवगडला परतले. त्यानंतर थोड्याच काळात त्यांनी श्रावण वद्य द्वादशीला आपला देह त्याग केला.
सेना महाराजांचे लेखन कार्य
सेनाजी स्वतः हिंदी भाषिक होते. त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला होता. त्यांनी मराठी, हिंदी, पंजाबी भाषांमधून अभंग रचले आहेत. सेनाजींनी आपल्या अभंगांतून सर्वसामान्य साधकांसाठी नामसंकीर्तन आणि भक्तिमार्ग सांगितला असला, तरी ते स्वतः ज्ञानमार्गाचे उपासक होते. समाजातील अज्ञान दूर करायचे असेल तर ज्ञानदीप लावण्याशिवाय अन्य पर्याय नाही, याची त्यांना जाण होती. म्हणून आयुष्यभर लोकांच्या बोली भाषेत, त्यांना समजेल, पेलेल, झेपेल अशा भाषेत उपदेश केला. मराठीत, सकलसंत गाथेत सेना महाराजांचे १४३ अभंग व इतर रचना आढळतात. यात गुरूविषयी आदरभाव प्रकट करणारे अभंग, नाममहात्म्य, विठ्ठल भक्तीपर अभंग; तसेच त्र्यंबकमाहात्म्य, आळंदीमाहात्म्य आणि सासवडमाहात्म्य ही तीन स्थानमाहात्म्ये सांगणारे अभंग; काही संत स्तुतीपर अभंग आहेत. त्यांनी रचलेली वासुदेव गीते आणि गौळणी आहेत. या त्यांच्या रचना अतिशय भावोत्कट आहेत. संत नामदेवांप्रमाणेच सेना महाराजांची ‘धूप दीप साजि आरती ... वारने जाऊ कमलापती ।’ ही रचना अतिशय सन्मान आणि आदरपूर्वक शीखांच्या पवित्र अशा गुरुग्रंथसाहेब या ग्रंथात समाविष्ट आहे. उत्तर भारताच्या वास्तव्यात त्यांनी हिंदीतून शेकडो अभंगांची निर्मिती करून सेन पंथ नावाची चळवळ सुरू केली. काही अभ्यासकांच्या मते संत सेना महाराजांच्या जीवनावर आणि विचारांवर बौद्ध महापंडित उपाली यांच्या विनय पिटक ग्रंथांचा प्रभाव होता.
काही अभ्यासकांच्या मते, सेनाजींचे मराठी भाषेवरील प्रभुत्व पाहता असे वाटते की, मुळचे मध्य प्रदेशातील असलेले सेना महाराज आपल्या पूर्वायुष्यात पंढरपूर परिसरात राहिले असावेत, वारकरी संप्रदायाच्या संस्कारात वाढले असावेत आणि आयुष्याच्या उत्तरार्धात परत गेले असावेत. आणि त्यानंतर त्यांचा गुरू रामानंदांशी सबंध आला असावा. तर काहींच्या मते सेना महाराज उत्तर भारतीय होते; ते रामानंदांचे शिष्य होते. तीर्थयात्रा करीत पांडुरंग दर्शनासाठी ते महाराष्ट्रात आले आणि नामदेव व इतर संतांसोबत सोबत येथेच रमले, राहिले. असे काही अभ्यासकांचे मत आहे.
संत सेना महाराजांचे गुरू ‘रामानंद’ तर गुरुबंधू कबीर आणि रैदास
सेनाजींचे आध्यात्मिक कर्तृत्व, त्यांच्या साहित्यातील व त्यांच्या विचारातील काळाच्या पुढे जाणारा पुरोगामी दृष्टिकोन याचा मागोवा आपण घेतला तर, त्यांच्यावर असलेला नामदेव-ज्ञानदेव या संतांचा प्रभाव जाणवतो. परंतु याच्याही आधी सेनाजींच्या मनातील पुरोगामी विचारांचा पाया त्यांचे गुरु रामानंद यांनी घातला असल्याचे लक्षात येते. संत कबीर आणि रैदास हे देखील रामानंदांचेच शिष्य आणि सेनाजींचे गुरुबंधू होते. म्हणून सेनाजींचे विचार समजून घेताना गुरू रामानंद यांची माहिती घेणे आवश्यक आहे.
संत सेना महाराजांचे गुरू रामानंद हे उत्तर भारतातील रामावत अथवा रामानंदी संप्रदायाचे प्रवर्तक आणि आद्य रामभक्त समजले जातात. त्यांचे अधिकृत चरित्र उपलब्ध नाही. परंतु समकालीन आणि उत्तरकालीन ग्रंथातून त्यांची जी चरित्रपर माहिती उपलब्ध होते त्यानुसार ते प्रारंभी शांकर अद्वैती मताचे होते, नंतर त्यांनी विशिष्ठाद्वैती असणाऱ्या राघवानंदांचे शिष्यत्व पत्करले. अध्ययनानंतर त्यांनी संपूर्ण भारताची तीर्थयात्रा केली. त्यानंतर ते जेव्हा मठात परतले त्यावेळी राघवानंदांच्या काही शिष्यांनी रामानंदाच्या मठातील वास्तव्याला विरोध केला. रामानंदांनी यात्रेदरम्यान खानपानाचे व स्पृश्यास्पृश्यतेचे निर्बंध पाळले नसावेत म्हणून त्यांच्या समवेत भोजनालाही नकार दिला. याचा परिणाम म्हणून रामानंदांनी गुरूंच्या आज्ञेवरून, जिथे फक्त भक्तीच प्रमाण असेल असा ‘रामावत’ वा ‘रामानंदी’ संप्रदाय स्थापन केला. याचे उपास्य दैवत राम होते.
हा एक नवा उदार दृष्टिकोन असणारा पंथ होता. ज्यात कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला व कर्मकांडांना थारा नव्हता. काशी येथे पंचगंगा घाटाच्या परिसरात मठ स्थापन केला. या मठातून त्यांनी बारा शिष्यांना उपदेश केला असे परंपरा सांगते. या बारा संतांमध्ये सर्व जाती, धर्माचे शिष्य होते. यात नाभिक समाजातील सेना महाराजांच्या बरोबरच संत कबीर, संत रैदासही होते. पद्मावती सारखी स्त्री होती. हा संप्रदाय म्हणजे दक्षिणेतील आणि उत्तरेतील भक्तिमार्गाला जोडणारा हा दुवा होता.
रामानंद हे केवळ आध्यात्मिक गुरू नव्हते तर ते स्वतंत्र प्रज्ञेचे संत होते, प्रभावशाली धार्मिक नेता होते. आणि जातिधर्माची बंधने झुगारणारे सुधारक होते. त्यांच्या विचारात सहृदयता, निर्भयता आणि उदार दृष्टिकोन होता. ते काशीतील विद्वान मुसलमानांशीही चर्चा करीत असत. सर्व सुधारकांप्रमाणे रामानंद यांनीही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पहिली गोष्ट कोणती केली असेल तर संस्कृतचा त्याग करून हिंदीचा पुरस्कार केला. याचा प्रभाव म्हणून संत सेनाजींनी आपल्या सर्व रचना हिंदी, नंतर मराठी आणि उत्तर भारतातील स्थानिक बोली भाषेतून केल्या. संत कबीर यांनीही आपल्या गुरूंचे भक्ती, उदारमतवाद आणि भाषेबद्दलचे हेच धोरण पुढे सुरु ठेवले. संत कबीर तर बोली भाषेच्या वापराबद्दल आपण का आग्रही आहोत याबद्दल म्हणतात, ‘संसकिरत है कूप जल, भाषा बहता नीर’. बोली भाषा ही वाहते पाणी आहे आणि संस्कृतला कूप जल म्हणण्यामागचे त्यांचे कारण संस्कृत भाषेचा वापर करून ज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचू न देण्याच्या उच्च वर्णीयांच्या कूपमंडूक वृत्तीवर आघात करणे हे होते. संत सेना महाराजांनी आपले गुरुबंधू असणाऱ्या संत कबीर आणि रैदास यांच्यावर हिंदीमध्ये महत्त्वाच्या रचना केल्या आहेत. ‘कबीर अरु रैदास संवाद’ आणि ‘कबीर रैदास स्तवन’ या रचनेतून या दोघांबद्दल आदरभाव प्रकट केला आहे.
पंढरपूर आणि वारकरी संप्रदायाची ओढ
गुरू रामानंदांच्या सहवासात आनंद असतानाही या सर्व काळात त्यांच्या मनात पंढरपूरची आणि विठ्ठल दर्शनाची ओढ आणि वारकरी सांप्रदायाबद्दल आंतरिक ओढ कायम होती. खरे तर ही ओढ त्यांचे पिताजी देविदास यांच्यापासून होती. म्हणून ते पंढरपूरला आले.
विठेवरी उभा जैसा लावण्याचा गाभा ।
पायी ठेवूनिया माथा । अवघी निवारली चिंता ।
समाधान चित्ता । डोळा श्रीमुख पाहाता ।
बहुजन्मी केला त्याग । सेना देखे पांडुरंग ।
अशी त्यांच्या मनाची अवस्था पांडुरंगाच्या दर्शनाने झाली. ‘जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची ।’ असे या ओढीचे वर्णन सेनाजींनी केले आहे. चंद्रभागेच्या वाळवंटातील संतांचा मेळा, त्यांच्यातील प्रेम, समता, परस्पराबद्दल परमादर, जाती पंथ विसरून एकमेकांच्या पायी लागणे, परस्परांना प्रेमालिंगन देणे हे पाहून सेना महाराज दिपून गेले. ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ याचा प्रत्यय त्यांनी घेतला. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. महाराष्ट्रात प्रथम त्यांची भेट संत नामदेवांशी झाली. नामदेवांशी त्यांचे सख्य फार जुळले. ते जणू नामदेवांच्या परिवाराचा एक भाग झाले. संत नामदेवाना ते वंदनीय मानीत होते.
भक्तामाजी अग्रगणी, तूची ऐकसि मनी ।
वैकुंठीच्या ध्वजा आणिल्या भूतळा लागोनी ।
जयजयाजी महाराजा, जिवलग नामया ।
आरती करिता चित्त रंगले तव पाया ।।
नामदेवांच्या सहवासात असताना ज्ञानदेवांना भेटण्याची ओढ मनात होतीच; परंतु नामदेवांशी झालेल्या चर्चेतून ज्ञानदेवांविषयी आणि त्यांच्या भावंडांविषयी माहिती समजली. दरम्यान ज्ञानदेवांनी समाधी घेतली होती. आणि सर्व भावंडेही अनंतात विलीन झालेली होती. ज्ञानदेवांविषयीच्या आंतरिक ओढीतून सेनाजी आळंदीस गेले. ज्ञानेश्वर समाधीचे दर्शन घेतले. आळंदीला वास्तव्य केले. त्यानंतर सासवडला सोपानदेव, त्र्यंबकेश्वरी निवृत्तीनाथ, एदलाबादला मुक्ताई यांच्या समाधीस्थानी भेटी दिल्या. ज्ञानेश्वरीचे पठन केले, त्यांना प्रत्यक्ष ज्ञानदेव भेटल्याचा आनंद मिळाला. परंपरेने आणि अनेक शतकांपासून सामान्यांच्या आवाक्याबाहेर असणारे ज्ञानाचे गुज निवृत्तीनाथांच्या आग्रहामुळे ज्ञानदेवांनी सर्वसामान्यांसाठी प्रकट केले, या कार्यातील ज्ञानदेवांची बंडखोरी सेनाजींच्या मनाला भावली.
श्रीगुरु निवृत्तिराय संप्रदाय दाविला । अलंकापूरवासिनी अधिकार तया दिधला ।।
आदिनाथे मूळ गुप्त होते ठेविले । निवृत्तीकृपेने ज्ञानदेवे प्रगट केले ।
अशा शब्दात त्यांनी ज्ञानदेवांची स्तुती केली आहे. ज्ञानदेवांना त्यांनी गुरू मानले. ज्ञानदेव हेच आपले माता-पिता आहेत. आणि आपल्या भवव्यथा ज्ञानदेवच दूर करू शकतील याचा विश्वास त्यांना होता.
ज्ञानदेव गुरू ज्ञानदेव तारू । उतरील पैलपारू ज्ञानदेव ।
ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता । तोडील भवव्यथा ज्ञानदेव ।
ज्ञानदेव माझे सोयरे धायरे । जिवलग निर्धारे ज्ञानदेवे ।।
सेना म्हणे, ज्ञानदेव माझा निधान । दाविसी निजखूण ज्ञानदेव ।।
नामदेवांच्या बरोबरच संत सावतोबा, संत चोखोबा यांच्या सहवासाने आणि ज्ञानदेवांच्या अभ्यासाने सेनाजींचा अध्यात्मविचार अधिक प्रगल्भ झाला. रामानदांनी पेरलेल्या भक्तीच्या, समतेच्या, आणि विवेकाच्या बीजाला या संतांच्या सहवासात अधिकच धुमारे फुटले.
स्वहित सांगावे भले । जैसें आपणासी कळे ।।
त्याच्या पुण्या नाही पार । होय अगणित उपकार ।।
आपले अनुभव, आपले चिंतन समाजाच्या भल्यासाठी सांगत राहावे अशी उर्मी त्यांच्या मनात जागी झाली. जे स्वहित आपणास कळते ते समाजाला सांगणे हेच पुण्याईचे काम आहे असे समजून त्यांनी साध्या सोप्या मराठी भाषेत समाजाला हितोपदेश करण्यास सुरुवात केली.
सेना महाराजांचा हितोपदेश
व्यसनाने कित्येक पिढ्यांची होणारी बरबादी सेनाजींना अस्वस्थ करीत होती. यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी काही रचना केल्या.
नका सेवू अफू, नका सेवू दारू । गांजाचे धुरा नाश होय ।
या व्यसनाने बुडाले किती । रांडा पोरे मरती ना खावया ।
शरीराजी भंगमान, गेले धन । पाहती किळवाणी जनामध्ये ।
सेना म्हणे सांगतो, धरा अंत:करणी । करितो विनवणी तुम्हालागी ।।
अफू, गांजा, दारू यांसारख्या व्यसनाने जीवनाचा नाश होतो. शरीर खचते, बायको-मुले उपाशीपोटी मारतात आणि समाजामध्ये अपमान होतो. हे विदारक सत्य सांगून लोकजागृती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सेनाजींच्या मते असत्य हे पाप आहे, सत्य हेच पुण्य आहे. सत्य हेच जनोद्धाराचे साधन आहे. सत्याने केलेले वर्तनच तुम्हाला परमेश्वराप्रत घेऊन जाईल.
कामातुर सांडी सज्जन लक्षण । मदिरा व्यसन बडबडी ।।
गांजा भांग अफू सेवी दृष्टी क्रूर । शरीर मुर्दाड कळत नाही ।।
आला विनाशकाल विपरीत बुद्धी । जुगारीचे छंदी नाना कळा ।।
सेना म्हणे धन घालविती दु:खी । परि हरि मुखी येईचिना ।।
माणसाचे अध:पतन होऊ नये म्हणून सेनाजी हितोपदेश करतात, कामातुर झालेल्या पुरुषाची बुद्धी विपरित तऱ्हेने वागते. दारूमुळे तो बेताल बडबड करतो. गांजा, भांग, अफू या नशेमुळे शरीर संपत जाते. जुगाराचा नाद लागल्याने सगळे धन जाते, एवढे सारे होऊनही त्याच्या मुखातून हरीचे नाव काही येत नाही. त्याचा विनाशकाळ जवळ आल्यानेच त्याला अशी बुद्धी होते.
आपल्या अभंगातून ते भक्तीला सर्वोच्च स्थान देतात. भक्तीसुखापुढे त्यांना स्वर्गाचीही तमा वाटत नाही. इतकेच नव्हे तर मोक्ष-मुक्ती यांचीसुद्धा अपेक्षा आम्हांस नाही, हेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. ‘सुखे घाली जन्मासी । हेंचि बरे की मानसी । वारी करीन पंढरीची । जोडी साची ही माझी ।।’ पंढरीची वारी करायला मिळणार असेल तर मला मोक्षाचीही अभिलाषा नाही. येथे अनुभवलेला आनंद त्या न अनुभवलेल्या स्वर्गापेक्षा आणि मोक्षापेक्षाही मोठा आहे.
आपले गुरू रामानंद यांच्याकडून अद्वैताचा धडा घेताना त्यांनी तो रोजच्या व्यवहारात आचरणात आणून दाखविला. अद्वैत विचार सांगतो, ‘सर्वाभूती एकच परमेश्वर वास करतो’ मग भेदाभेद कशासाठी ? असा त्यांचा सवाल होता. हे अद्वैत तत्त्वज्ञान एकतेच्या, समतेच्या आणि सर्वाभूती ममतेच्या वाटेवर घेऊन जाणारे होते. सेनाजींच्या मते अद्वैताचा हाच खरा अर्थ होता. परमेश्वराच्या ठायी भेदाभेद नसतो, हे वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान त्यांनी आचरणातून सिद्ध केले. स्वतःचे वंशपरंपरागत कार्य करताना ते स्वतः स्पृश्य-अस्पृश्य, उच्च-नीच, हिंदू-मुसलमान असा भेद करीत नसत. त्यामुळे त्यांच्या स्वजातीतील समाज त्यांच्यावर नाराज असे. पण त्यांच्या नाराजीची पर्वा न करता ते आपले काम सर्वांसाठी समभावनेने करीत असत.
कर्तव्यपरायणता हीच ईश्वरनिष्ठा
वारकरी संप्रदाय हा निवृत्तीपर शिकवण देणारा पंथ नाही, तर तो प्रखर प्रवृत्तीपर संप्रदाय आहे. माणसाने आपले जीवन आदर्शवत कसे व्यतित करावे याचा व्यवहारी उपदेश सर्व संतांनी केला आहे. कर्तव्याप्रती असणाऱ्या परमनिष्ठेने, सदाचरणाने परमेश्वराचे सानिध्य प्राप्त करता येते, इतके साधे सोपे त्यांचे अध्यात्म होते. परमेश्वराची भक्ती करण्यासाठी घरदार, बायको-पोरे सोडून, संसाराचा त्याग करण्याची गरज नाही, तर संसारात राहून, कुटुंबाचे पालनपोषण करीत, तुमचा नित्याचा जो व्यवसाय असेल तो करीतच तुम्ही परमेश्वर प्राप्ती करू शकता. फक्त त्यासाठी आपले कर्म निष्ठेने, प्रामाणिकपणे करा. आपला व्यवसाय म्हणजेच परमेश्वराची पूजा आहे. तीच परमेश्वराची आराधना आहे. संत ज्ञानदेवांपासून संत तुकारामांपर्यंत वारकरी संप्रदायातील जवळपास सर्व संतांनी हाच उपदेश केला आहे. सावतोबांना आपल्या फुललेल्या मळ्यात आपला विठ्ठल दिसला, तसेच बहुजन समाजात जन्मलेल्या गोरा कुंभार, नरहरी सोनार, चोखा मेळा, रैदास चांभार या सर्वांनी ‘कामातच आपला राम’ पाहिला. सेनाजींनीही आपल्या कर्मात परमेश्वर पाहिला. आपला व्यवसाय हा केवळ उदरभरणाचे साधन नाही, तर ती परमेश्वराची पूजा आहे, ही भावना मनी बाळगून त्यांनी आपले विहित कर्म केलेले दिसते.
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।
विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।।
उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।
भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।
चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।
नाभिकाच्या व्यवसायाच्या अनुषंगाने आत्मिक विकासाचे सुंदर रूपक सेनाजींनी रचले आहे आणि अहंकाराची शेंडी पिळून, काम-क्रोध याचा त्याग करायला लावून सेनाजींनी जणू विवेकाचाच आरसा प्रत्येकाच्या डोळ्यासमोर धरला आहे, प्रत्येकाच्या मनातील विवेकालाच साद घातली आहे. आणि हे करतानाही त्यांच्यातील समतेची भावना कायम आहे. कारण मी हे सर्व चारही वर्णांसाठी करतो आहे, हेही त्यांनी सांगितले आहे.
कर्मकांडांना विरोध - ‘अंधश्रद्धा हीच अधोगतीची जननी’
अंधश्रद्धेच्या जोखडात अडकलेले समाजमन बाहेर काढण्याचा प्रयत्न जवळपास प्रत्येक वारकरी संताने केला आहे. वारकरी संप्रदायातील संतांनी ईश्वरभक्तीबाबत जो हितोपदेश केलेला आहे. त्यात कर्मकांड आणि अंधश्रद्धा यांना कोठेही स्थान नाही. सेनाजीही याला अपवाद नाहीत. सेनाजींनी ईश्वरप्राप्तीचा मार्ग निखळ भक्ती हाच असल्याचे निःसंदिग्धपणे सांगितले आहे. होम-हवन, यज्ञ-याग, देहदंड याने झाले तर नुकसानच होईल परंतु ईश्वरप्राप्ती काही व्हायची नाही.
करिता योगयाग । न भेटेची पांडुरंग ।।
एका भावावांचोनि काही । देव जोडे ऐसा नाही।।धुम्रपानादि साधन । करितां व्यर्थ होय शीण ।।
करितां साधने शीणली । सेना म्हणे वायां गेली ।।
कोरडा जप-तप-यज्ञ-यागादी साधनांच्या द्वारे पांडुरंग भेटणार नाही. त्याला प्राप्त करायचा असेल तर मनात भक्ती आणि शुद्ध भाव असला पाहिजे. विनाकारण देहदंड सोसून भक्तीचे अवडंबर माजवू नका आणि त्यासाठी धुम्रपानादी अघोरी भक्ती करून शरीराचे व्यर्थ नुकसानही करून घेऊ नका, असा स्पष्ट उपदेश सेनाजींनी केला आहे. जप तप तीर्थाटन उपासतापास करणाऱ्या अंधश्रद्धाळू उपासकांना सेनाजींनी चांगलेच फटकारले आहे. ते म्हणतात,
कशासाठी करितां खटपट । तप तीर्थे व्रते अचाट ।।
न लागे शोधावे गिरिकानन । भावें रिघा विठ्ठल शरण ।।
आणि भक्तीचे हेच वास्तव समजल्याने ‘जाणोनी सेना निवांत बैसला । केशवराजा शरण निघाला।।’ अशी ग्वाही ते देतात. एकप्रकारे मनापासून भक्ती करणे, मन शुद्ध ठेवणे, शुद्ध आचरण करणे आणि आपले कर्म निष्ठेने करणे हीच ईश्वर पूजा, हे साधे सोपे आणि व्यवहारी अध्यात्म सेनाजींनी सर्वसामान्य जनांना सांगितले आहे.
आज एकविसाव्या शतकात आणि विज्ञानयुगात अंधश्रद्धा आणि कर्मकांडांचा माजलेला बाजार पाहताना मनात विचार येतो की, तेराव्या शतकात समाजाची काय परिस्थिती असेल ? आणि त्याही पेक्षा या तथाकथित धर्म रक्षकांना जाब विचारणाऱ्या आणि त्यांच्या फसवेगिरीला विरोध करणाऱ्या संतांचे धारिष्ट्य काय असेल ! ज्यावेळी जारण-मारण, भुते-खेते, बळी देणे, शांती घालणे, आणि देवतांचे नवससायास, पूजाअर्चा हाच धर्म समजला जात होता, अशा एका अंधाधुंदीच्या काळात नामदेव-ज्ञानदेव यांच्या पासून प्रेरणा घेऊन; वारकरी संप्रदायाची परंपरा सोबत घेऊन आणि पुरोगामी विचाराच्या गुरु रामानंदांचा उपदेश समोर ठेऊन सेनाजींनी या सर्व अनिष्ठ रूढी परंपरांना कट्टर विरोध केला.
घुमती या जागी अंगी दैवत खेळे । मरती का मुले वांचवेना ।।
चेटुक मेटुक साधन मंतर । दाविती प्रकार वाढुनियां ।।
आंधळे हे जग विसरती केशवा । शेंदराचे देवा आळविती ।।
सेना म्हणे हरी जगाचा नायक । कर्तव्य सुखदुःख देई कांही ।।
जगाचा नायक असणारा परमेश्वर प्रत्येकाला कर्तव्ये आणि सुखदुःख देत असतो आणि तोच निस्तरत असतो. किंबहुना आपले कर्तव्यच आपल्याला सुखदुःख देत असते. त्यामुळे असल्या अंधश्रद्धांपेक्षा परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि मुख्य म्हणजे आपले कर्म चोख आणि पवित्र ठेवा हाच उपदेश सेनाजींनी केला आहे.
धर्माच्या नावाखाली आपली आध्यात्मिक दुकाने उघडून त्याच्या नावाखाली व्यभिचार करण्याची प्रवृत्ती आजही समाजात दिसते. आणि या बुवा-बाबांना बळी पडणारी जनता आजही दिसते, तेव्हा ‘थाट माट करून लुबाडीत रांडा । ऐसिया पाखंडा भुलूं नये ।।’ हा सेनाजींचा रोकडा उपदेश किती व्यवहार्य आहे, हे लक्षात येते.
खरा धर्म वेगळा आणि धर्माचे थोतांड वेगळे. खरा धर्म शुद्ध आचार शिकवतो, अध्यात्माची गोडी लावतो, तर धर्माचे थोतांड करणारा स्वार्थासाठी धर्म वापरीत असतो, हे स्पष्टपणे सेनाजींनी सांगून ठेवले आहे. ‘धर्माचे थोतांड’ हा शब्दही त्यांचाच आहे.
धर्माचे थोतांड करुनी पोट भरी । भार्या मुले मठ मजा करी ।।
पुराण सांगत नागावाणी डोले । आविर्भाव फोल करिताती ।।
गळां माळा भस्म नेसे पितांबर । साधूचा आचार दाखवितो ।।
सेना म्हणे ऐसे दांभिका भजती । दोघेही जाती अधोगती ।।
असे धर्माचे थोतांड करणाऱ्यांच्या जे नादी लागतील त्यांची अधोगती ठरलेलीच आहे, किंबहुना ‘अंधश्रद्धा हीच अधोगतीची जननी आहे’ असा स्पष्ट निर्वाळा सेनाजींनी दिलेला असतानाही आजही आमचे डोळे उघडत नाहीत.
सेना न्हावी भक्त भला
वारकरी संप्रदायातील संतांमध्ये सेना महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. विशुद्ध विठ्ठलभक्ती, कर्मपरायणता आणि सामान्य जनांविषयी प्रचंड कळवळा हे त्यांच्या चरित्राचे प्रमुख विशेष आहेत. महाराष्ट्राबाहेर उत्तर भारतापर्यंत ज्यांनी वारकरी संप्रदायाचे कार्य पोहोचवले अशा संतांत नामदेवांच्या नंतर ज्यांचे नाव घ्यावे लागेल असे संत म्हणजे सेना महाराज. सेनाजींच्या कार्यावर आणि जीवनचरित्रावर मराठी, हिंदी, गुजराथी, संस्कृत, राजस्थानी, गुरुमुखी आदी भाषांमधून त्यांच्या समकालीनांनी आणि नंतरही कवने रचली आहेत. या प्रत्येक प्रांतांतील भक्तांना सेनाजी आपलेच आहेत असे वाटते. या प्रत्येक भागात त्यांची पूजा, जयंती, पुण्यतिथी उत्साहाने साजरी केली जाते. हा सेनाजींच्या व्यक्तिमत्त्वाच्या विशालतेचाच प्रभाव आहे.
समकालीन जनाबाईंनी सेनाजींचा अधिकार जाणला होता. सेनाजींच्या गोड व्यक्तिमत्त्वाचे वर्णन त्यांनी ‘सेना न्हावी भक्त भला । तेणे देव भुलविला ।।’ अशा शब्दात केले आहे. तर संत तुकारामांनी महाराष्ट्राबाहेर आणि तेही हलक्या समजल्या जाणाऱ्या कुळात जन्मलेल्या सेनाजींविषयी आणि अशा सर्व अठरापगड समाजातील संतांसाठी ‘पवित्र ते कुळ पावन तो देश । जेथे हरीचे दास जन्म घेती ।।’ असे गौरवोद्गार काढले आहेत. सेनाजींच्या भाक्तिसामर्थ्याची आणि आध्यात्मिक आधिकाराची स्तुती करणाऱ्या अशा रचना एकनाथ, बंका, निळोबा, कबीर, रैदास, अगदी मीराबाईनेही रचल्या आहेत. संत नामदेव, संत ज्ञानदेव यांनी सुरू केलेल्या आध्यात्मिक समतेच्या आणि समाजप्रबोधनाच्या या चळवळीतील सेना महाराजांचे योगदान महत्त्वाचे तर आहेच पण ते आजच्या काळालाही समयोचित आणि प्रस्तुत आहे. सेनाजी विठ्ठलाचे अनन्यभक्त तर होतेच पण खऱ्या अर्थाने समाजसुधारक संत, पुरोगामी विचारवंत होते.