Thursday, 16 January 2025

बापूजीच्या तत्त्वज्ञानाचे आस्तित्वरूप : ‘शिक्षणव्रती’ प्राचार्य अभयकुमार साळुंखे

बापूजीच्या तत्त्वज्ञानाचे आस्तित्वरूप : ‘शिक्षणव्रती’ प्राचार्य अभयकुमार साळुंखे 

कॅप्टन डॉ. महेश नारायण गायकवाड
प्र. प्राचार्य, आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, नागठाणे 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांचे कुटुंबप्रमुख आदरणीय अभयकुमार साळुंखे साहेब आज वयाची ७९ वर्षे पूर्ण पूर्ण करीत आहेत. अत्यंत आनंदाची भावना आज प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्यांच्या मनात आहे. हा आनंद केवळ अभयकुमार साळुंखे या व्यक्तीच्या वाढदिवसाचा नाही तर कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था या कुटुंबाचे प्रमुख आहेत, या नात्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याला झालेला हा आनंद आहे. संस्थेतील गुरुदेव कार्यकर्त्यांचे हे प्रेम अकृत्रिम आहे. 

 संस्थेतील प्रत्येक गुरुदेव कार्यकर्ता बापूजींची प्रतिमा अभयकुमार साळुंखे साहेबांच्या वर्तनात, बोलण्यात पहात असतो. साहेबांचा जीवनप्रवास आणि संस्थेचा इतिहास वेगळा करता येत नाही. जन्मापासून आजपर्यंत त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू विवेकानंद शिक्षण संस्था आहे आणि तोच जीवनाचा निदिध्यास आहे. सतत संस्थेच्या प्रगतीचा, संस्थेच्या प्रत्येक शाखेचा रात्रंदिवस विचार करणारे अभयकुमारसाहेब प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्यासाठी वंदनीय आहेत. आयुष्यातील अनेक प्रसंगात त्यांचे मार्गदर्शन घेताना मला त्यांच्याठिकाणी प्रत्यक्ष बापूजींचे दर्शन होते. काही चांगले काम केल्यानंतर साहेबांनी पाठीवर टाकलेल्या थापेमधून बापूजींच्या स्पर्शाची अनुभूती मिळते आणि खात्री पटते की, हा फक्त बापूजींचा रक्ताचा वारसा नव्हे तर बापूजींच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा आणि गुरुदेव कार्यकर्त्यांप्रति बापूजींच्या प्रेमाचा, आपुलकीचाही वारसा आहे.

महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात आभाळाएवढे कार्य करणार्‍या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी उर्फ गोविंद ज्ञानोजीराव साळुंखे आणि संस्थामाता सुशीलादेवी या दांपत्यापोटी १७ जानेवारी १९४६ रोजी अभयकुमार साहेबांचा जन्म झाला. या भाग्या बरोबरच येणाऱ्या जबाबदारीची जाणीव ही त्यांनी आजतागायत आपल्या प्रत्येक कृती आणि उक्तीमधून कायमच सांभाळली आहे. "शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी।।" हे तुकोबारायाचे वचन साहेबांनी आपल्या वर्तनातून सत्य करून दाखविले आहे.

शालेय वयापासून त्यांचा असणारा उमदा, धाडसी, निडर स्वभाव कायमच सर्वांच्या कौतुकाचा विषय होता. शाळा-कॉलेजच्या वयात मित्रमंडळीमध्ये असणारी त्यांची लोकप्रियता म्हणजे जणू त्यांच्यातील नेतृत्वगुणांचीच नांदी होती. १९७१ साली शिवाजी विद्यापीठातून मराठी विषय घेऊन त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर संस्थेत अधिव्याख्याता म्हणून ते रुजू झाले, तेही रीतसर पद्धतीने. तेही इतर प्राध्यापकांप्रमाणे रीतसर मुलाखत देऊन! नोकरी स्वीकारल्यानंतरही त्यांनी संस्थापकांचा मुलगा म्हणून कधीही सवलत घेतली नाही. तशी सवलत घेणे खुद्द बापूजींना ही आवडले नसते, याची जाणीव साहेबांनाही होती. म्हणूनच संस्था प्रशासनाला जिथे त्यांची गरज वाटली, तिथे त्यांनी सेवा केली. जत, कोल्हापूर, मिरज, उस्मानाबाद, तळमावले अशा विविध महाविद्यालयात त्यांनी कसलीही कुरबूर किंवा तक्रार न करता अध्यापन केले. "नोकरीत अट म्हणजे,  निष्ठेत घट" हे बापूजींचे वाक्य त्यांनी स्वतः पाळले, म्हणूनच आज हक्काने हे वाक्य ते सांगतात तेव्हा संस्थेतील सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांसाठी ते शिरोधार्य असते.

      मराठी विषयाच्या अध्यापनाचे कार्य करीत असतानाच १९७४ साली संस्थेने त्यांची आजीव सेवकपदी निवड केली. त्यानंतर १९७८ साली ते प्राचार्य झाले. त्या दिवसापासून त्यांनी स्वतःमध्ये आश्‍चर्यकारक बदल घडवून आणला. संस्थेचा प्रत्येक प्रश्न गंभीरपणे, विचारशील, चिंतनशील पद्धतीने समजून घेऊन आणि सर्व सहकार्‍यांना विश्वासात घेऊन प्रत्येक निर्णय घेण्याची स्वतःची एक कार्यपद्धती निर्माण केली, आणि ती आयुष्यभर अमलात आणली. संस्था सेवकांच्या मनावर त्यांच्या प्रशासनाचा एक कधीही न पुसला जाणारा सोनेरी ठसा उमटलेला आहे. संस्थेचे सेक्रेटरी म्हणून संस्थेची धुरा त्यांनी सन  १९८५ साली हाती घेतली. शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या ८ऑगस्ट  १९८७ रोजी झालेल्या महानिर्वाणानंतर संस्थेतील सर्व पदाधिकारी, गुरुदेव कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांनी प्राचार्य अभयकुमार साहेबांच्यावर विश्वास दाखवला. त्यांच्यामध्ये बापूजींचे अस्तित्व पाहिले. संस्थेचे हे शिवधनुष्य त्यांच्या हाती दिले. २००३ साली त्यांनी संस्थेच्या कार्याध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर काही काळ संस्थेचे अध्यक्षही झाले. या अशा अनेक नात्याने ते संस्थेची धुरा पेलत राहिले. या काळात अनंत अडचणी, सहनशक्तीची परीक्षा घेणारे कठीण प्रसंग व संकटे संस्थेवर येत असताना ते नेहमीच छातीचा कोट करुन समर्थपणे उभे राहिले. "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग।" हे संत वचन ते शब्दशः जगले आहेत.

संस्थेचे नेतृत्व करताना त्यांनी केवळ प्रशासक म्हणून काम केले नाही तर आपल्या स्नेहशील स्वभावामुळे ते संस्थेचे 'कुटुंबप्रमुख' झाले. संस्थेतील गुरुदेव कार्यकर्त्यांनी त्यांना स्वयंस्फुर्तीने आणि मनापासून दिलेले हे स्थान आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ध्येयवादीपणाचा, विचारांचा आणि निर्णयपद्धतीचा संस्कार आणि वसा हाती घेतला, तो आज पर्यंत सांभाळला आहे.

प्राचार्य पदापासून कार्याध्यक्ष पदापर्यंत अनेक पदावर कार्यरत असताना साहेबांनी प्रत्येक निर्णयातून संस्थेचे हित, शैक्षणिक, गुणात्मक प्रगती हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले आणि धोरणे राबविली. कठोर प्रशासकीय निर्णय घेतानाही व्रतस्थ मनाने आणि सारासार विचारानेच निर्णय घेतले कोणत्याही व्रताचा पाया संयम हाच असतो. त्यामुळेच शिक्षणाच्या व्रताला वाहून घेतेलेला एक  मुर्तीमंत 'शिक्षणवृत्ती' अभयकुमार साहेबांच्या रूपाने संस्थेस लाभला आहे. 

साहेबांच्या स्वभावात असणारी ही सहनशीलता, क्षमाशीलता आणि उदारता सर्वांसाठी आदर्शवत आणि मार्गदर्शक आहे. महात्मा गांधी म्हणत असत "ज्या निर्णयाने समाजातील शेवटच्या माणसाचे कल्याण होत असेल तोच निर्णय योग्य." अभयकुमार साहेबांनी संस्थेच्या बाबतीत कोणतेही निर्णय घेताना हेच सूत्र डोळ्यासमोर ठेवून, संस्थेचे आणि गुरुदेव कार्यकर्त्यांचे कल्याण साधण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. संस्था हितासाठी प्रसंगी कठोर भूमिका घेणारे साहेब, गुरुदेव कार्यकर्त्यांसाठी किती हळवे होतात आणि  त्याच्या भल्याचा विचार करतात हे आजपर्यंत अनेकांनी अनुभवले आहे. 

साहेबांचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि धीरगंभीर आवाज यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात एक आदरयुक्त दरारा असतो. पण त्यांच्या सहवासात आल्यानंतर दिसते ते त्यांचे नितळ स्वच्छ पाण्यासारखे पारदर्शी मन! संस्थेच्या भल्यासाठी म्हणून त्यांच्या आवाजात बापाची जरब असली तरी गुरुदेव कार्यकर्त्यांना आधार देणारा माऊलीचा हातही त्यांचाच असतो! "वरि घालितो धपाटा। आत आधाराला हात।।" याचे प्रत्यंतर सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांनी अनुभवले आहे.

आज संस्था त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वाटचाल करीत असताना, आधुनिक काळाची आव्हाने पेलत, नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत आहे. यामुळेच आज आपली संस्था उभ्या महाराष्ट्रासाठी एक शैक्षणिक प्रयोगशाळा बनली आहे.  संस्थेच्या प्रत्येक शाखेवर अभयकुमार साहेबांचे पुत्रवत प्रेम आहे. संस्थेच्या शाळा-कॉलेजच्या कोणत्याही शाखेचे प्रश्न, अडचणी त्यांना सदैव स्मरणात असतात. म्हणूनच शाखांना मदत करणारे स्थानिक ग्रामस्थ म्हणजे साहेबांच्या गळ्यातील ताईत असतात. विभागीय बैठकीत साहेब ज्या आदराने आणि सन्मानाने प्रत्येक ग्रामस्थांचे बोलणे ऐकतात, त्याला महत्त्व देतात, यावरून त्यांच्या मनातील ग्रामस्थांना विषयी असणारा आदर लक्षात येतो. ही त्यांच्या आगळ्यावेगळ्या प्रशासनाची खासियत आहे.

"जया शिरी कारभार। बुद्धी सार तयाची।।" या संत वचनाप्रमाणे संस्थेचा कारभार स्वतःच्या शिरावर घेत असताना त्यांचा संयम आणि सहनशीलता खरोखर विस्मय वाटावा एवढी प्रचंड आहे. जवळपास साडे दहा हजार सेवक, त्याचे प्रश्न,  शाखांच्या समस्या, अडचणी, राजकीय हस्तक्षेप आणि प्रचंड दबाव, शासकीय नियम आणि कायद्याची बंधने या सर्वांतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी 'संयम' आणि 'सहनशीलते'चा वापर केला. त्यांची 'दूरदृष्टी' आणि त्याबरोबरच स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लागणारे कठोर परिश्रम आणि त्याग ही अभयकुमार साहेबांच्या यशस्वी प्रशासनाची मूलभूत सूत्रे आहेत असे मला वाटते.

अभयकुमार साहेबांचे वक्तृत्व ही गुरुदेव कार्यकर्त्यांसाठी एक बौद्धिक मेजवानीच असते. त्यांच्या वक्तृत्वाला बापूजींच्या तत्वज्ञानाची ठाम बैठक असते. विचारांचा स्पष्टपणा, चांगल्याचे मनसोक्त कौतुक आणि या सर्वावर नर्म विरोधाचा शिडकावा आणि ऐकणाऱ्याला प्रत्येक वेळी एक तरी नवा विचार देणारे असे त्यांचे भाषण असते. त्यांच्या प्रत्येक भाषणातून संस्था प्रगतीचे नवे आयाम, नवी स्वप्ने, नवी ध्येये गुरुदेव कार्यकर्त्यांसमोर उभे राहत असतात. त्यांच्या वाणीतून आणि वक्तृत्वातुन नेहमीच पूज्य बापूजींचे अस्तित्व प्रत्ययाला येत असते.
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्याजन्मशताब्दी वर्षाच्या नियोजनामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे 'शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे जन्मशताब्दी गौरवग्रंथ - विवेकदीप'. या गौरव ग्रंथाचे कार्यकारी संपादक म्हणून साहेबांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली. साहेबांनी दाखवलेला हा विश्वास माझ्यासाठी अनमोल आहे. ग्रंथाच्या निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर साहेब जातीने लक्ष घालीत होते. मार्गदर्शन करीत होते. आणि प्रत्येक वेळी माझा विश्वास वाढवीत होते. त्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे हा गौरव ग्रंथ पूर्णत्वास गेला. एक दर्जेदार संदर्भ ग्रंथ म्हणून तो आकाराला आला. माझ्यासारख्या धडपडणार्‍या गुरुदेव कार्यकर्त्याला साहेबांनी एक प्रकारे दिलेला हा मोठा सन्मान होता. काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे अशा पद्धतीने बळ वाढवणे हीच साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे आणि वेगळेपण आहे.

संस्था स्थापन झाल्यापासून बापूजींच्या महानिर्वाणापर्यंत तीन दशकांचा काळ हा पूज्य बापूजींचा नेतृत्वाखालील संस्थेच्या उभारणीचे एक पर्व आहे. तर त्यानंतरची पुढील चार दशके अभयकुमार साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला संस्थेचा उत्कर्ष आणि विकास, हे संस्थेच्या इतिहासातील दुसरे पर्व आहे. बापूजींनी लावलेल्या रोपट्याचा त्यांनी रक्त आणि घामाचे  शिंपण करून वटवृक्ष केला आहे.
 आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करीत स्वतःला सिद्ध करीत आणि बापूजींच्या तत्त्वज्ञानावर अढळ निष्ठा ठेवीत मार्गक्रमण करणारे साहेब आमच्यासारख्या गुरुदेव कार्यकर्त्यांसाठी महान आदर्श आहेत. बापूजींच्या ध्येयमार्गावरून अथक वाटचाल करून, विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, महाराष्ट्रात शिक्षणाची क्रांती करून, बापूजींचे स्वप्न वास्तवात आणणे हेच अभयकुमार साहेब यांच्या आयुष्याचे ‘व्रत’ आहे. खरोखरच एका 'शिक्षणमहर्षीं'चा वारसा समर्थपणे चालवणारे अभयकुमार साळुंखेसाहेब हे खऱ्या अर्थाने 'शिक्षणव्रती' आहेत.

अवघ्या महाराष्ट्राला प्रकाशमान करणाऱ्या पाटणच्या कोयनेच्या पाण्याची ऊर्जा आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीला अखंड अभिषेक करणाऱ्या पंचगंगेच्या पाण्याचे पवित्र्य साहेबांच्या व्यक्तीमत्वात एकवटलेले आहे. म्हणूनच या दोन्ही जीवनदायिनींप्रमाणे साहेबांचा जीवन प्रवाह देखील त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाचे जीवन समृद्ध करीत अखंड वाहत आहे. आणि यापुढेही शतकोत्तर तो असाच अखंड वाहत राहावा साहेबांचे आशीर्वाद आम्हां सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांच्या पाठीशी अखंड राहावा, साहेबांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे हीच आज या निमित्ताने बापूजींच्या चरणी विनंती आणि परमेश्वराकडे प्रार्थना.

Friday, 20 December 2024

संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन 🙏

बाबा...
माथ्यावरच्या मातीच्या खापरातून
अवघ्या महाराष्ट्रभर ज्ञानाचा सूर्य वाटला,
तुकोबांचा अभंग गाताना,
विज्ञानाचा विचार पेरला.

हातातील दगडांच्या टाळातून 
उडलेल्या ठिणग्यांमधून 
विवेकाच्या मशाली पेटवल्या.

मळलेल्या मनाची वस्त्रे धुताना
समाजाच्या मेंदूतील 
अंधश्रद्धेची जळमटे झाडली.

सगळ्यांचे जगणे लख्ख करीत,
आणि विचार स्वच्छ करीत
माणसाला माणूस व्हायला शिकवले.

बाबा,
तुकोबाला अपेक्षित धर्म
फक्त तुम्हालाच कळला,
आणि तुमच्यामुळेच आम्हाला...!

--- डॉ. महेश गायकवाड, सातारा

संत गाडगेबाबांना विनम्र अभिवादन🙏🙏
🙏🏻🙏🏻

Friday, 1 September 2023

"विवेकानंद संस्थेच्या देव्हा-यातील समई संस्थामाता सुशीलादेवी साळुखे"

"विवेकानंद संस्थेच्या देव्हा-यातील समई संस्थामाता सुशीलादेवी साळुखे"
                 प्रा. डॉ. महेश नारायण गायकवाड
           आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, नागठाणे 
                                 (मो. - 8208835510)
“आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं !"
             'आई' या शब्दातच आकाशाची विशालता आणि ईश्वराची महानता सामावलेली आहे. आपल्या पोटच्या लेकरांचा सांभाळ करणारी आई ही जर इतकी महान असेल तर समाजातल्या गोरगरीब, दीनदुबळ्या, उपेक्षित-दलित अशा साऱ्या लेकरांना आपल्या पोटाशी घेऊन त्यांच्यावर मातृत्वाचा वर्षाव करणारी 'ती' आई केवढी महान असेल ? नक्कीच आकाशापेक्षाही विशाल आणि ईश्वराइतकीच महान असेल !

               श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था नावाच्या गजबजलेल्या घरामध्ये साऱ्यांना आपल्या मातृत्वाची सावली देणारी माऊली म्हणजे संस्थामाता सुशीलादेवी साळुखे ! शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुखे यांच्याशी विवाह झाल्यापासून बापूजींसोबत सावलीसारख्या राहिलेल्या सुशीलादेवी बापूजींच्या निर्वाणानंतर साऱ्या संस्थेची आणि गुरूदेव, कार्यकर्ते, विद्यार्थी यांची सावली बनून राहिल्या.

             सुशीलादेवींचा जन्म ४ सप्टेंबर १९२७ रोजी बेळगाव येथे दत्ताजीराव नानासाहेब चव्हाण पाटील यांच्या सधन शेतकरी कुटुंबात झाला. मातृछत्र लहानपणीच हरवले. छोट्या सुशीलाचा सांभाळ आजी कृष्णाबाई यांनी केला. आजीमुळे सुशीलादेवींना अध्यात्माचे बाळकडू मिळाले. लहानपणी त्या खेळकर होत्या. तशाच त्या कष्टाळूही होत्या. शेतातील सर्व कामे त्या कुशलतेने करायच्या.

             गोविंद ज्ञानोजीराव साळुखे म्हणजेच बापूजी साळुखे यांच्याशी त्यांचा विवाह १५ डिसेंबर १९४० साली झाला आणि सुशीलादेवींच्या आयुष्यातील एका तेजस्वी पर्वाची सुरूवात झाली. विवाहानंतर थोड्याच काळात बापूजी साळुंखे सोंडूर संस्थानामध्ये दाखल झाले. बापूजींचे गुरू व इतिहासाचे नामवंत प्राध्यापक आप्पासाहेब पवार यांना सोंडूरच्या घोरपडे घराण्याचा इतिहास लिहायचा होता. याठिकाणी बापूजी आणि सुशीलादेवी राजघराण्याच्या सहवासात ऐश्वर्यात राहिल्या. तिथल्या राणीसाहेबांसोबत सुशीलादेवींची मैत्री झाली.

              पण बापूजी हे एक ध्येयवादी व्यक्तिमत्त्व होते. ऐश्वर्यात लोळत राहणे त्यांच्यातील देशभक्त, कार्यकर्त्याला सहन होणे शक्य नव्हते, म्हणून महात्मा गांधीजींच्या चले जाव आंदोलनात आणि १९४२च्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी उडी घेतली आणि सोंडूरचे राजवैभव सोडून भूमिगत चळवळीत सहभाग घेतला.

              पडवळवाडी (ता.वाळवा) सारख्या लहान खेड्यात अत्यंत हालअपेष्टांचे आणि कष्टाचे जीवन त्यांनी जगायला सुरूवात केली. जेवढ्या आनंदाने सुशीलादेवींनी बापूजींना राजवैभवात साथ दिली त्याच आनंदाने त्यांनी भूमिगत चळवळीच्या कष्टप्रद, आव्हानात्मक जगण्यातही साथ दिली.

                 या काळात बापूजींनी स्वातंत्र्यलढ्यात भूमिगत चळवळीत सहभाग घेतला. मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजकारणाचा मोह सोडून त्यांनी शिक्षणप्रसाराचा, खडतर समाजसेवेचा मार्ग स्वीकारला आणि रयत शिक्षण संस्थेतील नोकरीचा त्याग करून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था स्थापन केली. यावेळेपर्यंत बापूजी आणि सुशीलादेवी यांच्या संसारवेलीवर अरूणा, अभयकुमार, सुधा, शरद, दीपक आणि विद्या ही गोंडस आणि गोड फळे लगडली होती. एका बाजूला बापूजींचे ध्येयवादी खडतर व्यक्तिमत्त्व आणि दुसऱ्या बाजूला तितक्याच समरसतेने त्यांना साथ देणाऱ्या सुशीलादेवी त्यामुळे संसार गरिबीचा असला तरी सात्विकतेचा होता आनंदाचा होता.

            डॉ.बापूजी साळुखे जसे ध्येयवादी कार्यकर्ते होते, तसेच ते प्रापंचिक सद्गृहस्थ होते. श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा पसारा ज्यावेळी बापूजी मांडीत होते त्याच वेळी त्यांच्या धर्मपत्नी सुशीलादेवी कोंड्याचा मांडा करून संसार चालवित होत्या आणि बापूजींना अंगीकृत कार्यासाठी बळ देत होत्या. बापूजींनी मुलांसाठी बोर्डीग सुरू केले. संपूर्ण महाराष्ट्रातून गोरगरीब, दलित, अनाथ मुले त्या बोडींगमध्ये दाखल झाली. त्या मुलांसाठी सुशीलादेवी आई झाल्या. आपल्या मुलांइतकीच माया, प्रेम त्यांनी या मुलांनाही दिले. त्यांची दुखणी, आजारपण काढली, सणादिवशी गोडधोड खायला दिले. आणि आपल्या मातृत्वाला आकाशाएवढे विशाल केले.

              सुशीलादेवी कधी संस्थेच्या कार्यालयात आल्या नाहीत की संस्थेच्या कामकाजात सहभाग घेतला नाही. संस्थामातांच्या या त्यागाप्रती आणि निस्वार्थी कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व गुरूदेव कार्यकर्त्यांनी एकमुखाने आणि एकमताने २७ मे २०१२ रोजी संस्थामातांची निवड संस्थेच्या कार्याध्यक्ष पदी केली. तरीही त्या पदाधिकारी म्हणून संस्थेत कधीच आल्या नाहीत. परंतु, संस्था सुरळीत चालावी, तिचा नावलौकिक वाढावा यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील राहिल्या.

         बापूजींच्या आणि संस्थामातांच्या सावलीत वाढलेले संस्थेचे अनेक विद्यार्थी पुढे संस्थेत गुरूदेव कार्यकर्ते झाले, अनेक संस्थेत पदाधिकारी झाले. ते केवळ संस्थामाता सुशीलादेवींच्या प्रेमाने आणि प्रेरणेने ! या विद्यार्थ्यांना त्या नेहमी संस्थेचा विचार करायला आणि बापूजींच्या ध्येयवादावर विश्वास ठेऊन वाटचाल करायला सांगत; आणि प्रवृत्त करीत.

           बापूजींनी सुशीलादेवींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, “पतीच्या मार्गातील काटे पत्नीने काढून त्याचा मार्ग सुखकर करून देणे हे पत्नीचे कर्तव्य असते, म्हणूनच मोठमोठ्या साध्वी स्त्रियांनी ज्या ज्या वेळी आपल्या पतीवर अडचणी येतील त्या त्या वेळी त्यांनी आपल्या प्राणत्यागाची देखील झीज सोसून आपल्या पतीचे जीवन सुखी केले." बापूजींच्या या वचनाप्रमाणेच सुशीलादेवींनी आपले सारे जीवन समर्पित केले. आणि 'आपण नोकरीकरता आलो नसून समाजाचा संसार जोडण्याकरिता आलो आहोत.' या बापूजींच्या वाक्याला स्मरून त्यांना अखेरपर्यंत साथ दिली.

           बापूजींच्या हयातीमध्ये त्या बापूजींच्या कार्याला 'साथ' देत राहिल्या आणि बापूजींच्यानंतर त्या संस्थेच्या कार्याला आपल्या 'सात्विकतेचे बळ' देत राहिल्या ! स्वत: नेहमी खडतर आयुष्य जगून समाजाचे, आपल्या विद्यार्थ्यांचे, संस्थेतील गुरूदेव कार्यकर्त्यांचे आयुष्य सुखमय करीत राहिल्या.

             मंगळवार दि. २२ ऑक्टो, २०१३ हा दिवस म्हणजे संस्थेतील सर्व विद्यार्थी, गुरूदेव कार्यकर्ते आणि संस्थासेवकांसाठी मोठी दु:खद बातमी घेऊन आला. या दिवशी संस्थामाता सुशीलादेवी साळुखे यांचे देहावसान झाले. संस्था खऱ्या अर्थाने पोरकी झाली. त्यांचे जाणे संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना, गुरूदेव कार्यकर्त्यांनाच नव्हे तर साऱ्या संस्थेला पोरके करून जाणारे ठरले. त्यांच्या रूपाने 'मातृत्वाचा एक वैश्विक अविष्कार' महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्राला अनुभवायला मिळाला.

                स्वतः कायम अंधारात राहून सभोवतालच्या साऱ्यांची आयुष्ये प्रकाशाने उजळून टाकणाऱ्या संस्थामाता सुशीलादेवी साळुखे यांचे आयुष्य समईतील ज्योतीप्रमाणेच शांत, शीतल, सात्त्विक आणि संस्थारूपी देव्हारा प्रकाशाने उजळून टाकणारे होते. 
          कवी फ.मु.शिंदे 'आई' कवितेत जे म्हणतात ते सुशीलादेवींच्या निर्वाणानंतर आपण खऱ्या अर्थाने अनुभवले...

'आई असते एक धागा 
वातीला उजेड दावणारी 
समईतली जागा. 
घर उजळतं तेव्हा 
तिच नसतं भान 
विझून गेली अंधारात की 
सैरावैरा धावायलाही 
कमी पडतं रान !"

संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.🙏🏻

Tuesday, 12 July 2022

🙏गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूवंदन🙏

🙏 गुरूपौर्णिमेनिमित्त गुरू वंदन 🙏
                                           
गुरू राजा संतकुळाचा
दावी मार्ग उत्कर्षाचा

            गुरू उपासक सत्य-शिवाचा
            आणि निर्माता सौंदर्याचा

गुरू ध्यास उदात्ततेचा
आणि उपासक मांगल्याचा

            गुरू उगम सर्व ज्ञानाचा 
            खळाळता झरा उत्साहाचा

गुरू निष्ठावान कर्तव्याचा
आहे प्रतीक आदर्शाचा

            गुरू स्वामी वाणी, लेखणीचा
            जन्मदाता सर्व क्रांत्यांचा

गुरू ध्यास सर्वोत्तमाचा
अन् शिल्पकार पुर्णत्वाचा

            गुरू विश्वास वात्सल्याचा
            आधार साऱ्या अस्तित्वाचा
   
(रचना- प्रा. कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, मो. - 8208835510) 

प्रथम गुरु आईपासून ते आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञानाच्या मार्गावर पुढे घेऊन जाणाऱ्या प्रत्येक गुरुला विनम्र अभिवादन...🙏🏻

🙏🌹गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹🌹🙏

Wednesday, 8 June 2022

‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि वारकरी संप्रदाय : एक अनुबंध’


‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि वारकरी संप्रदाय : एक अनुबंध’

          प्रा. डॉ. महेश नारायण गायकवाड

          प्र प्राचार्य, 

          शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड

सत्वशील समाजनिर्मितीसाठी सात्विक विचारांची गरज असते. समाज, संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान साहित्य आणि शिक्षण या साऱ्यांमध्ये एक अंत:शृंखला असते, एक अनुबंध असतो. संस्कृती. धर्म. तत्त्वज्ञान आणि या तीनही गोष्टी ज्या माध्यमातून आविष्कृत होतात संक्रमित होतात ते साहित्य आणि शिक्षण, या साऱ्यातून समाज घडत असतो. समाज सत्वशील घडवायचा असेल तर समाजाची संस्कृती आणि धर्म सत्वशील असला पाहिजे त्या संस्कृतीचे आणि धर्माचे तत्त्वज्ञानही सत्वशील असायला हवे. या सत्वशीलतेतूनच सुसंस्कार घडत असतो.

मग सत्त्वशीलता म्हणजे काय ? सत्वशील असण्याची नेमकी परिभाषा काय ? ही परिभाषा खरेतर प्रत्येक धर्माने प्रत्येक पंथाने आणि प्रत्येक संप्रदायाने आपणाला दिली आहे. ती त्यांच्या त्यांच्या काळाप्रमाणे संस्कृतीप्रमाणे विचाराप्रमाणे आहे. ती थोडी थोडी भिन्नही आहे, पण तरीही खूपशी समान आहे. या साऱ्या धर्म पंथ संप्रदायातील सद्विचारांचा किमान समान एक विचारांचा धागा काढला तरी असे आढळेल की हे एक समान सूत्र आहे, आणि हे सूत्र म्हणजे मानवी मूल्य, मानवतावाद !

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक, संस्थापक शिक्षणमहर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांचा या सर्व धर्मांचा व धर्मांच्या तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास होता. विशेषतः वारकरी संप्रदाय आणि त्याचे तत्त्वज्ञान त्यांनी आत्मसात केलेले होते. म्हणूनच त्यांनी लिहिलेल्या संस्थेच्या प्रार्थनेत मानवतावाद म्हणजे काय आणि मानवतावादी समाज म्हणजे नेमके काय याची अचूक व्याख्या दिली आहे ते म्हणतात. 

    सत्यशील प्रामाणिकता त्याग पिळवणुकीस आळा

    मानव्याचे अधिष्ठान इशतत्त्वदर्शन

   त्यांचे ज्ञान नी विज्ञान हाच सुसंस्कार

   विवेकाच्या आनंदाचा लाभ शिक्षणात।।

मला वाटते माणसाला माणूस बनवणारे आणि मानव्याचे अधिष्ठान असणारे हे तत्त्वज्ञान बापूजींनी सांगितले आहे. मानवतेचा पाया असणारी ही तत्त्वे बापूजींनी प्रार्थनेत कोठून घेतली हेही त्यांनी याच प्रार्थनेत सांगितले आहे. ते म्हणतात

राम कृष्ण रहीम ख्रिस्त बुद्ध झरथुष्ट्र

महावीर मानव संत मानव्याचे दीपस्तंभ

लीनदीन होऊनी त्याचे वंदुया चरण

हे मानव्याचे म्हणजेच मानवतेचे दीपस्तंभ आहेत. यातील प्रत्येक महामानवाच्या चरित्रातून याच मानवतावादी मुल्यांचा उद्घोष होत आहे. बापजींनी दिलेली ही प्रार्थना केवळ ईश्वराची प्रार्थना नाही, तर ती ‘ईशतत्त्वाची आराधना’ आहे. सर्व धर्मातील अंतिम सत्याला कवेत घेण्याचा तो एक प्रयत्न आहे. सर्व धर्मांना स्वतःत सामावून घेऊन, सर्व धर्मांच्या पलीकडील मानवतेला साद घालणारी आर्तता म्हणजे ही प्रार्थना आहे. राम-कृष्णांचे ‘उदार वैश्विक हिंदुत्व’,  गौतम बुद्धांनी मानवतेच्या कल्याणाकरिता दिलेली ‘पंचशील तत्वे’, येशू ख्रिस्ताने दिलेली ‘करुणा’, पैगंबराने शिकवलेली ‘बंधुता’, झरथुष्ट्राने शिकवलेल्या ‘ज्ञानरुपी अग्नीची उपासना’, महावीरांनी सांगितलेले ‘अहिंसा, सत्य,अस्तेय’ आणि महात्मा गांधींनी दिलेला ‘सत्यमेव जयते’ हा महामंत्र या पायावरच बापूजींच्या प्रार्थनेतील आणि तत्वज्ञानातील “सत्य, शील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणुकीस आळा” ही ‘पंचशील’  उभी आहेत. सत्य, शील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणुकीस आळा ही पंचशील तत्त्वे तर बापूजींचे नाते थेट बुद्धाशी जोडतात. समाजातील माणसात बदल घडवून, त्याला मानवतेचा उपासक बनवून त्यातून समाज घडवणाऱ्या बापूजींना अपेक्षित असणाऱ्या मानवतेची ही परीभाषा आहे. 

बापूजींच्या जीवनकार्याचा पाया हा ‘सर्वे सुखिना सन्तु । सर्वे सन्तु निरामया ।।’ हाच होता. समाजातील सर्व लोकांनी सुखी असावे, आनंदी असावे याकरता त्यांची तळमळ होती. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत, भूमिगत चळवळीत आणि महात्मा गांधींच्या अहिंसात्मक आंदोलनात सहभागी होण्यामागची त्यांची हीच भूमिका होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मिळालेल्या स्वराज्याला सुराज्यात बदलायाचे असेल, देश सुजलाम सुफलाम बनवायचा असेल तर शिक्षणापासून वंचित, दुर्लक्षित समाज शिक्षणाच्या छत्राखाली आणला पाहिजे, असे त्याना मनोमन वाटत होते म्हणून त्यांनी  आपल्या कार्यासाठी शिक्षण क्षेत्र निवडले. ‘अवघे विश्वचि माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना चराचर । आपण जाहला ।।’ हीच त्यांची समाजाकडे पाहण्याची भावना होती. 

संपूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्राला दिशा देणारे आणि समाजाला उन्नत करणारे कार्य कोणते असेल, तर ते शिक्षणप्रसाराचे. हे कार्य त्यांनी विवेकानंद शिक्षण संस्था स्थापन करून सुरु केले. या त्यांच्या कार्याचा पाया आणि यशस्वितेचे गमक म्हणजे त्यांची धार्मिक वृत्ती, सात्विक आचरण, मानवतावादी विचार हाच आहे ! बापूजींच्या विचार, आचार, तत्त्वज्ञान यांचा पाया म्हणजे श्रीमद्भागवत गीता, ज्ञानेश्वरी, गाथा व वारकरी संप्रदायातील संतांचे तत्त्वज्ञान होते. बापूजींचे तत्त्वज्ञान आणि वारकरी संप्रदाय यांचा अनुबंध आपण समजून घेतला पाहिजे.   

महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी आहे. महाराष्ट्राच्या मातीचा आणि संस्कारांचा गुणच असा आहे की इथल्या संतांनी विरांच्या मनातील वीरश्री जागी केली आहे, आणि विरांनीही संतांनी दाखवलेल्या सदाचाराच्या आणि सद्वर्तनाच्या मार्गाने वाटचाल केली आहे. समाजकारण, राजकारण आणि धर्मकारण या सर्वांना एकत्र घेत वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय ! या संप्रदायाचा पाया ज्ञानदेवांनी घातला आणि त्याचा कळस होण्याचा मान संतश्रेष्ठ जगदगुरू तुकाराम महाराजांना मिळाला. ही केवळ कवीकल्पना नाही तर या सर्व संतांचे कर्तृत्वच एवढे श्रेष्ठ आहे की, आजही महाराष्ट्र या संतांच्या मार्गदर्शनावर आपली वाटचाल करतो आहे. बदलत्या काळावर विजय मिळवून आजच्या काळालाही सुसंगत असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान या संत साहित्यात आहे. बापूजींनीही याच मार्गाने आयुष्यभर वाटचाल केली. 

बापूजींचे स्नेही आणि मार्गदर्शक असणाऱ्या स्वामी रामानंद भारती यांचे संस्थेच्या आणि बापूजींच्या जीवनात मोलाचे स्थान आहे. संस्थेच्या सुरुवातीला संस्थेला ‘संत शिक्षण संस्था’ असे नाव द्यावे असा विचार बापूजींचा होता. परंतु स्वामी रामानंद भारती यांनी बापूजींना सांगितले की, संस्थेने स्वामी विवेकानंदांच्या शैक्षणिक विचारावर काम करावे असे मला वाटते. त्यावरूनच स्फूर्ती घेऊन बापुजींनी संस्थेचे नाव ‘श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था’ ठेवले. बापूजीनी स्वामी रामानंद भारती यांची त्यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांची सेवा केली. त्याच्याबद्दलच्या नितांत आदरातून बापूजीनी तासगावच्या शाळेला स्वामी रामानंद भारती यांचे नाव दिले. 

सात्विकता हा बापुजींच्या व्यक्तिमत्वाचा विशेष गुण होता. बापुजींच्या स्वभावातील संतत्व दाखवणारी खुण म्हणजे त्यांच्या मनात गोर-गरीब मुलांच्या बद्दल असणारी कणव आणि प्रचंड कळवळा. या गरीब अनाथ मुलांचे बापूजी आई-वडील होऊन जायचे. संपूर्ण महाराष्ट्रातून वाड्या-वस्तीवरून होस्टेलला आलेल्या मुलाची ते जीवापाड काळजी घ्यायचे. 

‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ।

तोची साधू ओळखावा I देव तेथेची जाणावा ।।’

दिवाळीच्या सणाला घरातील मुलांना जे गोड-धोड केले जायचे तेच या मुलांसाठी दिले जायचे. आई वडील नसलेल्या या मुलांना समोर बसवून आंघोळ घालताना संस्थामाता सुशीलादेवी आणि बापूजींना कधी परकेपणा वाटला नाही. या होस्टेल मधील मुलांच्यात दलित मुले होती, आदिवासी होती, अनाथ मुले होती. हे वाचले की, संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलेले साधुत्त्वाचे आणि देवत्त्वाचे लक्षण आठवते, या संतत्वाचा चालता-बोलता अविष्कार म्हणजे बापुजींचे जीवन होते. “येथे कुल जातीवर्ण । अवघे चि गा अकारण ।।” असे मानून  सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न बापुजींनी केला केला. त्यांनी आपल्या आयुष्यात जात, धर्म, पंथ असले कोणतेही भेद मानले नाहीत. सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना पोटच्या लेकराप्रमाणे हृदयाशी धरले. मानवता हाच बापूजींचा धर्म होता !    

वारकरी संतांवर बापूजीचा इतका प्रगाढ विश्वास होता की कोणत्याही सत्तेपुढे आणि धनदांडग्यापुढे कधीही न वाकणारे बापुजी संतांच्यासमोर नतमस्तक असायचे. बापूजींचा स्वाभाविक ओढा हा नेहमीच वारकरी संप्रदायातील संतांकडे होता. बापूजी ज्या ज्या वेळी पंढरपूरला जायचे, त्या त्या वेळी ते आवर्जून दादामहाराज मनमाडकर यांना भेटायला जायचे.कैकाडी महाराजांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. 

संताचिये पायी हा माझा विश्वास ।

सर्वभावे दास झालो त्यांचा ।।

ही त्यांची भावना असायची. संस्थेचे एक विभागीय शिबीर त्यांनी पंढरपूरला संत गाडगेबाबांचे परमशिष्य शिंदे महाराजांच्या मठात घेतले होते. या वेळी बापूजींनी पंढरपुरातील वारकरी परंपरेतील सर्व लोकाना या अधिवेशनासाठी निमंत्रित केले होते. वारकरी परंपरेचे वारसदार असणाऱ्या आणि संत गाडगेबाबांचे सच्चे पाईक असणाऱ्या शिंदे महाराजांचा बापूजींशी आंतरिक स्नेह होता. त्यांनीच सर्वात प्रथम बापूजींचा उल्लेख ‘शिक्षणातील महर्षी’ असा केला होता, आणि तोही सातारा येथील श्री भवानी विद्यामंदिर येथे झालेल्या शिबिरात केला होता, त्याचेच पुढे रुपांतर बापूजींच्या ‘शिक्षणमहर्षी’ उपाधीत झाले 

महाराष्ट्र शासनाने व्यसनमुक्ती अभियानासाठी सन्मानित केलेले आणि दिल्लीत घेतलेल्या ज्यांच्या पारायणाला स्वतः इंदिरा गांधी येऊन बसल्या होत्या असे हरी भक्ती परायण पुंडलिक महाराज वेळूकर यांनी संस्थेवर बापूजींवर आणि बापुजींच्या विचारावर आयुष्यभर नितांत प्रेम केले. आपल्या गावात शाळा असली पाहिजे आणि ती बापूजींच्याच संस्थेची असली पाहिजे असा त्यांनी आग्रह धरला. आणि संस्थेचे एक संस्कृती केंद्र सातारा जिल्ह्यातील वेळू या गावात सुरु झाले. 

पाचगणीचे दत्तात्रय महाराज कळंबे यांचे आणि बापूजींचे आत्मीय नाते होते. कळंबे महाराजांनाही गोरगरीब जनतेबद्दल कळवळा होता, या समान विचारातून ते एकत्र आले, आणि त्यांचे स्नेहबंध तयार झाले. पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणाला भारतातील शैक्षणिक केंद्र म्हणतात. पण हे शिक्षण फक्त गर्भश्रीमंतांच्याच मुलांना उपलब्ध होते. तिथल्या सामान्य जनतेला हे शिक्षण परवडणारे नव्हते. म्हणून कळंबे महाराजांना पाचगणीत शाळा सुरु करायची होती, पण ती शाळा फक्त बापूजींचीच असली पाहिजे, या हट्टाने त्यांनी बापूजीना तिथे शाळा सुरु करण्यासाठी मदत केली. आज तेथे संस्थेचे हायस्कूल आणि कॉलेज दोन्ही सुरु आहेत.

बापूजींचे व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायाशी जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणजे, बापूजींचे संगीत प्रेम ! बापुजी स्वतः उत्तम हार्मोनिअम वाजवत होते. त्यांचा आवाज फार गोड होता. ते भजने खूप गोड आवाजात गात असत. होस्टेलच्या पाचवीपासून ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्याना एकत्र करून ते भजने गाऊन दाखवत, त्यांचा अर्थ सांगत. एखादी ओवी, एखादा अभंग घेऊन त्याचे निरुपण करीत. संस्थेच्या कामाने, व्यापाने किंवा ताण-तणावाने कधी जर बापुजी अस्वस्थ असले तर घरी आल्यावर शांतपणे ते आपले हार्मोनिअम काढत आणि आपल्या सुरेल आवाजात भजने गायला सुरुवात करत. भजनाच्या त्या सात्विक अर्थात आणि गोड सुरावटीत आपली सारी दु:खे, सारा त्रास, सारा ताण-तणाव विसरून जात. संस्थेची प्रार्थना म्हणजे बापूजींच्या आध्यात्मिक विचारसरणीचा परिपाक आहे.

आर्थिक चारित्र्य आणि आर्थिक नितीमत्ता हा बापुजींच्या आग्रहाचा विषय होता. संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये त्यांनी साधेपणा आणि काटकसर याचा आग्रह धरला आहे.

जोडोनिया धन उत्तम व्येवहारे । उदास विचारे वेच करी ।

उत्तमची गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीवखणी ।।   

या संत तुकारामांच्या वचनाप्रमाणे संस्था समाजाच्या पैशातून उभी राहते, अशा वेळी संस्थेच्या शाखांचे हिशोब सर्वांना पाहण्यासाठी खुले ठेवण्याचेही आश्वासन त्यांनी आपल्या उद्दिष्टांमध्ये दिले आहे. एका आदर्श सामाजिक संस्थेला मार्गदर्शक ठरावीत अशी ही उद्दिष्टे आजही संस्थेतील गुरुदेव कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरत आहेत.

बापूजी नेहमी विचार, आचार आणि उच्चार यांच्या यांच्या शुद्धतेचा आग्रह धरीत असत. शुद्ध, सात्विक, निर्मळ जीवन जगण्याबाबत बापूजींचा आग्रह असे. 

नाही निर्मळ जीवन । काय करील साबण ।।

तैसे चित्त शुद्धी नाही । तेथे बोध करी काई ।।

स्वतः बापूजीही त्याचे काटेकोरपणे पालन करीत. आपल्या गुरुदेव कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते नेहमी सांगत की, तुम्ही ‘ससंसुंम’ यांपासून दूर राहिले पाहिजे. ‘ससंसुंम’ म्हणजे सत्ता, संपती, सुंदरी आणि मदिरा या दुर्गुणांपासून शिक्षकाने कायम दूर राहिले पाहिजे. बापूजींच्या या तत्त्वज्ञानावरुनच लक्षात येते की, बापूजींचा पिंडच आध्यात्मिक प्रवृत्तीचा होता.          

     आज महाराष्ट्र ज्या शिक्षणप्रसाराची सुमधूर फळे चाखीत आहे, त्या शिक्षणप्रसाराचा वृक्ष ज्या महामानवांनी लावला, त्यातील एक अग्रगण्य नाव म्हणजे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे. या फळांनी लगडलेल्या प्रचंड वृक्षाच्या सावलीत बसताना आणि त्या वृक्षाच्या सुमधुर फळांचा आस्वाद घेताना, त्या वृक्षाच्या वाढीसाठी कोणत्यातरी एका बीजाने स्वतःला जमिनीत गाडून घेतले आहे. हे आपण विसरता कामा नये. स्वतःला जमिनीत गाडून घेणाऱ्या बिजाप्रती आपण नेहमीच कृतज्ञ असले पाहिजे. म्हणूनच महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे जीवन घडविणाऱ्या, जिथे कोणत्याही सोयीसुविधा पोहोचलेल्या नाहीत अशा ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत शिक्षणाची गंगा घेऊन जाणाऱ्या आणि  हजारो गुरुदेव कार्यकर्त्यांची कुटुंबे सुखी समाधानी आणि आनंदी करणाऱ्या ‘श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थे’चे संकल्पक, संस्थापक शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या त्यागाचे, परिश्रमाचे आणि कठोर ध्येयनिष्ठध्येयनिष्ठेचे आपण कृतज्ञतेनेस्मरण करणे आवश्यक आहे.
स्वातंत्र्योत्तर काळातील शिक्षणप्रसाराच्या इतिहासात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या योगदानाची दखल उभ्या महाराष्ट्राने घेतली आहे. कर्मवीरांच्यानंतर त्याच प्रेरणेने आणि झपाटलेपनाने उभा महाराष्ट्र पिंजून काढीत महाराष्ट्राच्या खेड्या-पाड्यापर्यंत पोहोचत,  शिक्षणप्रसाराचा हा ज्ञानयज्ञ अखंडपणे तेवत ठेवण्याचे कार्य बापूजींनी केले आहे. म्हणूनच या महामानवाच्या त्यागाला वंदन करून त्यांच्या पायी नतमस्तक होणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. 


Saturday, 5 February 2022

"संगीताला पोरके करून... 'आनंदघन' बरसून गेला"


"संगीताला पोरके करून... 'आनंदघन' बरसून गेला"    
                                            - डॉ. महेश गायकवाड

       आजचा दिवस येऊच नये असं प्रत्यक्ष काळालाही वाटले असेल, असा दिवस दुर्दैवाने आज उगवला आणि प्रत्येक भारतीयाचा स्वतःचा स्वर जणू आज अबोल झाला.

 'आनंदघन' स्वर बरसून गेला
अर्थ नवा जगण्याचा सांगून गेला
लय तालालाही 
स्वरताल हा देऊन गेला
सतारीला अबोल करुन
संगीताला पोरके करुन...
असीम विस्तीर्ण गांधारात
'आनंदघन' स्वर विलीन झाला
'आनंदघन' बरसून गेला....!

        संगीताचे एक सुवर्णयुग संपले... प्रत्येक भारतीयाची दिदी गेली आणि संगीताची 'माऊली' गेली...!

             संगीत ही भारतीय संस्कृतीने श्वासोच्छावासाइतकी जपलेली नैसर्गिक गोष्ट आहे. संपूर्ण भारतीय समाज संगीतमय झालेला समाज आहे. इथं मूल जन्माला येतं त्यावेळी कुणीतरी गात असतं आणि माणूस मरतो त्यावेळीही कुणीतरी गातच असतं. आयुष्यात एखादीतरी ओळ गुणगुणली नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. गाणं हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. अशा भारतीय समाजाच्या संगीतासाठी आसुसलेल्या कानांचे कोडकौतुक पूरवण्यासाठी प्रत्यक्ष संगीताच्या देवीने अवतार घ्यावा तशी गेली जवळजवळ आठ दशके लता मंगेशकर नावाची एक गानसरस्वती संपूर्ण संगीत विश्व आपल्या मधाळ आवाजाने व्यापून टाकते आहे. कधी आईच्या मायेने जवळ घेणारा, कधी बहिणीच्या नात्याने गोंजारणारा, तर कधी प्रियकर - प्रेयसीची व्याकूळता व्यक्त करणारा आणि तेवढ्याच ताकतीने ग्यानबा - तुकोबाची संतवाणी किंवा मीरेच्या भजनातील आर्तता दाखवणारा हा आवाज आता आमचा मानसिक आधार बनला आहे!

              प्रत्येक वयाच्या व्यक्तीला आपला वाटणारा आणि वाढलेल्या वयाचा कोणताही मागमूस नसलेला तो आवाज शेवटपर्यंत तसाच गोड होता. 

               मराठी रंगभूमीवरील प्रसिध्द गायक, लतादीदींचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या समृध्द गायकीचा वारसा त्यांना जन्माने मिळाला. लहानपणी अंगणात खेळत असलेल्या लताने, चुकीच्या पध्दतीने गात असलेल्या दीनानाथांच्या विद्यार्थ्याला पळत घरात जाऊन ‘पूरिया धनाश्री' राग बरोबर गाऊन दाखवण्यास सुरुवात केली. वडील दीनानाथांनी ते ऐकले आणि लताचे संगीत गुण आणि समज त्यांनी ओळखली त्या दिवसापासून लतांची संगीताची शिकवणी सुरु झाली . निसर्गाने दिलेल्या ईश्वरी आवाजाबरोबरच लतादीदींनी कठोर परीश्रम आणि अखंड रियाज करीत अनेक गुरुंकडून ज्ञान मिळवीत या आवाजाला पैलू पाडले.

             वयाच्या तेराव्या वर्षी चित्रपटातील पार्श्वगायनाची सुरुवात केल्यापासून आजपर्यंतची त्यांची गाणी म्हणजे चित्रपट सृष्टीचा इतिहास आहे. जगभरातल्या जवळजवळ बावीस भाषातून त्यांनी गाणी गायली आहेत आणि ही प्रत्येक भाषा आत्मसात करण्यासाठी कष्ट केलेले आहेत. निव्वळ हिंदी, उर्दू आणि संस्कृत भाषांच्या उच्चारावर प्रभूत्व मिळवण्यासाठी त्यांनी आयुष्यातले कित्येक तास आणि दिवस खर्ची घातले आहेत.

                   १९४७ साली भारताच्या स्वातंत्र्याबरोबर लतादीदींची संगीतमय कारकिर्द बहरु लागली होती. अनिल विश्वास, सी. रामचंद्र , रोशनलाल , मदनमोहन यांसारख्या जुन्या संगीतकारांपासून ते अलीकडच्या राम - लक्ष्मण, जतीन-ललीत, ए.आर रहमान पर्यंतच्या संगीतकारांच्या अनेक पीढ्यांबरोबर त्यांनी काम केले आहे. रफी, मुकेश, किशोरकुमार, मन्ना डे, हेमंतकुमार, गीता दत्त, शमशाद बेगम, आशा भोसले यांसारख्या गायक - गायिकांबरोबर अनेक अविस्मरणीय गाणी गायली आहेत 'आयेगा आनेवाला' पासून ते अगदी 'दीदी तेरा देवर दिवाना' पर्यत अनेक हिंदी गाणी रसिकांच्या ओठावर खेळत असतात आणि मराठीत त्यांनी गायिलेली हजारो गाणी हा तर मराठी माणसासाठी अमूल्य ठेवाच आहे . 

           'या चिमण्यांनो परत फिरारे', 'मालवून टाक दीप', 'श्रावणात घन निळा बरसला' ही गाणी किंवा ज्ञानदेवांची अभंगवाणी असणारी ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा', 'आजी सोनीयाचा दिनू' अशी गाणी असोत किंवा 'खुलवीते मेंदी माझा रंग गोरापाण, ' किंवा 'किती जीवाला राखायचं' अशी लावण्याची खाण असणारी मराठी लावणी असो किंवा अंगावर रोमाचं उभे करणारे ‘जयोस्तुते श्री महन्मंगले' असो किंवा स्वत: लतादीदींनी 'आनंदघन' नावाने स्वरसाज चढवलेले 'ऐरणीच्या देवा' किंवा 'बाई बाई मनमोराचा' असो. आठवायला बसलं तर दीदींची हजारो मराठी, हिंदी गाणी भोवताली फेर धरु लागतात. त्यांनी गायलेल्या गाण्यांचा नुसता आढावा घ्यायचा म्हटलं तर त्यावर एक स्वतंत्र पुस्तक तयार होईल! 

                 पण हे लिहीताना माझी भूमीका अभ्यासकाची नाहीच. संगीत तज्ज्ञाची तर नाहीच नाही. ती भूमीका आहे संगीत देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या अजाण पण भावीक वारकऱ्याची, आध्यात्म कळो ना कळो वारकऱ्याला जशी परब्रम्हाच्या दर्शनाची ओढ असते तशी लतादिदींच्या आवाजाची आणि गाण्याची एक अनावर ओढ मनात कायम जाणवत असते!

           लतादीदींनी गायलेली भक्ती गीते ऐकताना किंवा 'ज्योती कलश छलके' सारखं रागदारीवर आधारीत गाणं ऐकताना वाटतं. प्रत्यक्ष भगवंतांनीच तीच्या गळ्यात बासरीचे सुर ओतले असावेत. त्यामुळे त्या गळ्यातून निघणारा 'गांधार' ईश्वरीच असणार! आणि हा आवाज ऐकणं यापेक्षा ईश्वराच्या अस्तित्वाची वेगळी प्रचिती ती काय असणार! लता दीदींनीही आपले गायन एखाद्या तपश्चर्येप्रमाणे जपले होते, वाढवले होते. दीदी ज्यावेळी जगात कुठेही रंगमंचावर गाणे गाण्यासाठी येत असत, त्यावेळी पायात चपला घालीत नसत आणि त्यांच्या आगमनाबरोबर समोरचा हजारोंचा श्रोतृवर्ग मग तो भारतातला असो वा परदेशातला, मंत्रमुग्ध होवून आपोआप उभा राहत असे!

           आजपर्यंत त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले आहेत. फिल्मफेअर पुरस्कार तर शेवटी नवीन गायीकांना संधी मिळावी म्हणून स्वीकारायचा बंद केला. दादासाहेब फाळके पुरस्कारांपासून ते 'भारतरत्न' पर्यत शेकडो पुरस्कार मिळवूनही त्या मात्र आजपर्यत लता मंगेशकर'च राहिल्या! आणि त्यामुळेच आज लता मंगेशकर' हीच या संगीत क्षेत्रातली सर्वोच्च पदवी झाली आहे!

          लतादीदींचे गाणे हा विषय संगीताची आवड असणाऱ्या कोणत्याही माणसाला बोलताना कधीही कंटाळा न येणारा आणि कितीही बोलले तरी बोलून न संपणारा विषय! पण सुगंध हा जसा अनुभवायचा विषय आहे तसे लतादीदींचे गाणे हा अनुभवायचा विषय आहे . म्हणून दीदींच्या गाण्यांचे स्वर दिवसातील प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक प्रसंगी मनात रुंजी घालत असतात. 

                मानवी जीवनातील असा कोणताही प्रसंग नाही ज्यासाठी दिदींनी गाणं गायलेलं नाही. अशी कोणतीही मानवी भावना नाही, जी त्यांच्या गाण्यातून व्यक्त झालेली नाही. म्हणून तर लतादीदींचा स्वर आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. जोपर्यंत मानवाच्या मनात भावना जिवंत आहेत तोपर्यंत हा स्वर, हा आवाज असाच अजर, अमर चिरतरुण राहील... जगण्याचे बळ देत राहील...!

Sunday, 16 January 2022

विवेकानंद संस्थेची 'अक्षय ज्ञानशिदोरी' - प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब.


विवेकानंद संस्थेची 'अक्षय ज्ञानशिदोरी' - प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब.
                                - प्रा. डॉ. महेश गायकवाड                                             - व्यवस्थापक मंडळ सदस्य
                           श्री स्वा. वि. शिक्षण संस्था, कोल्हापूर

            श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, विवेकानंद परिवाराचे कुटुंबप्रमुख मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब आज वयाच्या ७७ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. ‘आजी सोनियाचा दिनु। वर्षे अमृताचा घनु।।’ अशी भावना आज प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्यांच्या मनात आहे. हा आनंद केवळ अभयकुमार साळुंखे या व्यक्तीच्या वाढदिवसाचाच नाही, तर साहेब संस्था कुटुंबाचे प्रमुख आहेत, या नात्याने झालेला हा आनंद आहे. संस्थेतील गुरुदेव कार्यकर्त्यांचे साहेबांच्यावरील हे प्रेम अकृत्रिम आहे. संस्थेच्या कोणत्याही शाखेवर साहेबांबरोबर जाण्याचा योग आला, की संस्थेतील शिपायापासून ते मुख्याध्यापक-प्राचार्यापर्यंत प्रत्येक गुरूदेव कार्यकर्त्याचे साहेबांवरील अकृत्रिम प्रेम लक्षात येते. या भेटीवेळी मुख्य कार्यक्रमानंतर साहेब जेंव्हा गुरूदेव कार्यकर्त्यांशी मनमोकळा आणि स्नेहशील संवाद साधतात आणि प्रत्येकाची आस्थेने नाव, गाव, सेवा, अडीअडचणी याबद्दल चर्चा करतात त्या वेळी प्रत्येक सेवकाचा ऊर साहेबांच्यावरील प्रेमाने भरून येतो. हा प्रसंग खरोखरच अनुभवण्यासासारखा असतो. यापाठीमागची वडीलकीची, आपुलकीची भावना अनुभवताना, त्यांच्याठिकाणी फक्त अभयकुमारसाहेबच दिसत नाहीत, तर त्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष बापूजींचे दर्शन होते.

              महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात आभाळाएवढे कार्य करणार्‍या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी उर्फ गोविंद ज्ञानोजीराव साळुंखे आणि संस्थामाता सुशीलादेवी या दांपत्यापोटी १७ जानेवारी १९४७ रोजी अभयकुमार साहेबांचा जन्म झाला. हे त्यांचे भाग्य तर आहेच, पण या भाग्या बरोबरच येणाऱ्या जबाबदारीची जाणीव ही त्यांनी आजतागायत आपल्या प्रत्येक कृती आणि उक्तीमधून कायमच सांभाळली आहे. "शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी।।" हे तुकोबारायाचे वचन साहेबांनी आपल्या वर्तनातून सत्य करून दाखविले आहे. आज विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वाटचालीचा मी विचार करतो, त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि  प्राचार्य अभयकुमार साळुंखे दोघेही एकाच वेळी उभे राहतात. संस्थेतील प्रत्येक गुरुदेव कार्यकर्ता बापूजींची प्रतिमा अभयकुमार साळुंखे साहेबांच्या वर्तनात, बोलण्यात पहात असतो. साहेबांचा जीवनप्रवास आणि संस्थेचा इतिहास वेगळा करता येत नाही. जन्मापासून आजपर्यंत त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू विवेकानंद संस्था आहे आणि तोच जीवनाचा निदिध्यास आहे  सतत संस्थेच्या प्रगतीचा, संस्थेच्या प्रत्येक शाखेचा रात्रंदिवस विचार करणारे अभयकुमारसाहेब म्हणूनच सर्वांसाठी वंदनीय आहेत. माझ्या आयुष्यातील अनेक प्रसंगात त्यांचे अचूक मार्गदर्शन, काही चांगले काम केल्यानंतर साहेबांनी पाठीवर टाकलेल्या थापेमधून बापूजींच्या स्पर्शाची अनुभूती मिळते आणि खात्री पटते की, हा फक्त बापूजींचा रक्ताचा वारसा नव्हे तर बापूजींच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा आणि गुरुदेव कार्यकर्त्यांप्रति बापूजींच्या प्रेमाचा आपुलकीचाही वारसा आहे.

            शालेय वयापासून त्यांचा असणारा उमदा, धाडसी, निडर स्वभाव कायमच सर्वांच्या कौतुकाचा विषय होता. शाळा-कॉलेजच्या वयात मित्रमंडळीमध्ये असणारी त्यांची लोकप्रियता म्हणजे जणूकाही त्यांच्यातील नेतृत्वगुणांचीच नांदी होती. विद्यालयीन जीवनात त्यांनी विविध खेळाची, कुस्तीची आणि अभिनयाचीही आवड जोपासली होती. यातूनच उमदा स्वभाव आयुष्यातील प्रत्येक घटनेकडे खिलाडू वृत्तीने पाहण्याची सवय निर्माण होत गेली. १९६८ साली विवेकानंद महाविद्यालयातून बी.ए. आणि १९७१ साली शिवाजी विद्यापीठातून मराठी विषय घेऊन त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर संस्थेत अधिव्याख्याता म्हणून ते रुजू झाले. प्राध्यापक म्हणून संस्थेच्या विविध शाखांवर सेवा करीत असताना विद्यार्थ्यांचे अलोट प्रेम त्यांनी संपादन केले. खरेतर विद्यार्थीप्रिय प्राध्यापक हीच त्यांची खरी ओळख आहे. मराठी विषयाच्या अध्यापनाचे कार्य जीव ओतून करीत असतानाच १९७४ साली संस्थेने त्यांची आजीव सेवकपदी निवड केली. त्यानंतर १९७८ साली ते प्राचार्य झाले. त्या दिवसापासून त्यांनी स्वतःमध्ये आश्‍चर्यकारक बदल घडवून आणला. संस्थेचे सेक्रेटरी म्हणून संस्थेची धुरा त्यांनी सन  १९८५ साली हाती घेतली. शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या ८ऑगस्ट  १९८७ रोजी झालेल्या महानिर्वाणानंतर संस्थेतील सर्व पदाधिकारी, गुरुदेव कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांनी प्राचार्य अभयकुमार साहेबांच्यावर विश्वास दाखवला. त्यांच्यामध्ये बापूजींचे अस्तित्व पाहिले. संस्थेचे हे शिवधनुष्य त्यांच्या हाती दिले. २००३ साली त्यांनी संस्थेच्या कार्याध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर काही काळ संस्थेचे अध्यक्षही झाले. या अशा अनेक नात्याने ते संस्थेची धुरा पेलत राहिले. या काळात अनंत अडचणी, सहनशक्तीची परीक्षा घेणारे कठीण प्रसंग व संकटे संस्थेवर येत असताना ते नेहमीच छातीचा कोट करुन समर्थपणे उभे राहिले. "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग।" हे संत वचन ते शब्दशः जगले आहेत.

            संस्थेचा प्रत्येक प्रश्न गंभीरपणे, विचारशील, चिंतनशील पद्धतीने समजून घेऊन आणि सर्व सहकार्‍यांना विश्वासात घेऊन प्रत्येक निर्णय घेण्याची स्वतःची एक कार्यपद्धती निर्माण केली, आणि ती आयुष्यभर अमलात आणली. संस्था सेवकांच्या मनावर त्यांच्या प्रशासनाचा एक कधीही न पुसला जाणारा सोनेरी ठसा उमटलेला आहे. आपल्या नावाप्रमाणेच सर्वांना 'अभय' देणारे साहेब स्वतःही सर्व भय आणि दबावाच्या पलीकडे आहेत. जे स्वतःला पटेल आणि जे संस्थेच्या हिताचे आहे, तेच निर्णय त्यांनी ठामपणे घेतले आहेत, घेत आहेत.

प्राचार्य पदापासून कार्याध्यक्ष पदापर्यंत अनेक पदावर कार्यरत असताना साहेबांनी प्रत्येक निर्णयातून संस्थेचे हित, शैक्षणिक, गुणात्मक प्रगती हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले आणि धोरणे राबविली. कठोर प्रशासकीय निर्णय घेतानाही व्रतस्थ मनाने आणि सारासार विचारानेच निर्णय घेतले कोणत्याही व्रताचा पाया संयम हाच असतो. त्यामुळेच शिक्षणाच्या व्रताला वाहून घेतेलेला एक  मुर्तीमंत 'शिक्षणवृत्ती' अभयकुमार साहेबांच्या रूपाने संस्थेस लाभला आहे.
"सुखी संतोषा न यावे। दुःखी विषादा न भजावे।
आणि लाभालाभ न धरावे। मनामाजी।।"
ज्ञानदेवांच्या या ओवी प्रमाणेच मानसन्मान सुख-दुःख, आनंदाचे प्रसंग, परीक्षा घेणारे समर प्रसंग अशा सार्‍या प्रसंगातही ते कायम अविचल शांत राहिले. आपल्यावर प्रेम करणाऱ्यांना सोबत घेऊन आणि कोणी वेगळा विचार करीत असेल तर त्याला प्रेमाने जिंकून साहेबांनी प्रत्येकाला संस्थेच्या प्रवाहात प्रवाहित केले. साहेबांच्या स्वभावात असणारी ही सहनशीलता, क्षमाशीलता आणि उदारता सर्वांसाठी आदर्शवत आणि मार्गदर्शक आहे. महात्मा गांधी म्हणत असत "ज्या निर्णयाने समाजातील शेवटच्या माणसाचे कल्याण होत असेल तोच निर्णय योग्य." अभयकुमार साहेबांनी संस्थेच्या बाबतीत कोणतेही निर्णय घेताना हेच सूत्र डोळ्यासमोर ठेवून, संस्थेचे आणि गुरुदेव कार्यकर्त्यांचे कल्याण साधण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. संस्था हितासाठी प्रसंगी कठोर भूमिका घेणारे साहेब, गुरुदेव कार्यकर्त्यांसाठी किती हळवे होतात आणि  त्याच्या भल्याचा विचार करतात हे आजपर्यंत अनेकांनी अनुभवले आहे.

            अभयकुमार साहेबांचे वक्तृत्व ही गुरुदेव कार्यकर्त्यांसाठी एक बौद्धिक मेजवानीच असते. त्यांच्या वक्तृत्वाला बापूजींच्या तत्वज्ञानाची ठाम बैठक असते. व्यवहारी अनुभवाचे दाखले, कधीकधी परखडतेकडे झुकणारा विचारांचा स्पष्टवक्तेपणा, चांगल्याचे मनसोक्त कौतुक करणारे आणि या सर्वावर नर्म विरोधाचा शिडकावा करणारे, असे त्यांचे भाषण असते. विचारप्रगल्भ आणि ऐकणाऱ्याला प्रत्येक वेळी एक तरी नवा विचार देणारे असे त्यांचे भाषण असते. हा विचार नेहमीच श्रोत्यांच्या विचार करायला गतिमान करणारा असतो. प्रत्येक भाषणातून एखादा तरी नवा विचार, बापूजींचा नवा पैलू दाखवणारा प्रसंग यात असतो. त्यांच्या प्रत्येक भाषणातून संस्था प्रगतीचे नवे आयाम, नवी स्वप्ने, नवी ध्येये गुरुदेव कार्यकर्त्यांसमोर उभे राहत असतात. त्यांच्या वाणीतून आणि वक्तृत्वातुन नेहमीच पूज्य बापूजींचे अस्तित्व प्रत्ययाला येत असते. संस्था स्थापन झाल्यापासून बापूजींच्या महानिर्वाणापर्यंत तीन दशकांचा काळ हा पूज्य बापूजींचा नेतृत्वाखालील संस्थेच्या उभारणीचे एक पर्व आहे. तर त्यानंतरची पुढील तीन दशके अभयकुमार साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला संस्थेचा उत्कर्ष आणि विकास, हे संस्थेच्या इतिहासातील दुसरे पर्व आहे. बापूजींनी लावलेल्या रोपट्याचा त्यांनी रक्त आणि घामाचे  शिंपण करून वटवृक्ष केला आहे.

                 साहेबांच्या पंचाहत्तरीनिमित्ताने सर्व गुरूदेव कार्यकर्त्यांनी उत्साहाने आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात साहेबांनी केलेले भाषण हा त्यांच्या सुसंकृत आणि विनयशील स्वभावाचा एक उत्तम नमुना होता. त्यावेळी साहेब म्हणाले होते, “माझा वाढदिवस हे एक निमित्त समजा पण या निमित्ताने सर्व समाजाचे आणि गुरुदेव कार्यकर्त्यांचे जे अकृत्रीम प्रेम मी पाहतो आहे ते माझ्यासाठी अनमोल आहे. आज आपण मला ‘कुटुंबप्रमुखा’चे स्थान देता आहात. माझ्या वयोमानाप्रमाणे ते योग्यही असेल पण मला हा उल्लेख ऐकताना याचे समाधान वाटते की, आपण सर्वजन स्वत:ला विवेकानंद शिक्षण संस्था या कुटुंबाचे एक घटक मानता आहात. ही कौटुंबिक प्रेमाची भावना मला सुखावणारी आह. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या पोटी माझा जन्म झाला. जन्माने मी जरी त्यांचा वारस असलो तरी मला पूर्णपणे याची जाणीव आहे की, बापुजींच्या बरोबर आणि बापुजींच्या नंतर त्यांच्या कार्यावर श्रद्धा ठेऊन संस्था उभारणीसाठी तन, मन, धन अर्पण करून कार्य करणारे हजारो गुरुदेव कार्यकर्ते हे बापुजींच्या विचाराचे खरे वारसदार आहेत. मी त्यांचा एक प्रतिनिधी, एक विश्वस्त आहे. महात्मा गांधी यांनी सामाजिक जीवनातील विश्वस्त ही संकल्पना सर्वात प्रथम आपल्या ‘हिंद स्वराज’ या पुस्तकात मांडली. हीच संकल्पना संस्थेच्या प्रशासानाबाबातीत आणि आर्थिक व्यवहाराबाबतीत बापूजी साळुंखे यांनी स्वत: अंगिकारली आणि त्याचाच संस्कार माझ्यावर झालेला आहे, त्याप्रमाणे वागण्याचा मी नेहमी प्रयत्न करीत आलो आहे.”

               स्वतःचा वाढदिवस कधीही साजरा न करणाऱ्या साहेबांचा वाढदिवस २०१९-२० सालापासून म्हणजे बापूजींच्या जन्मशताब्दीपासून सर्व गुरूदेव कार्यकर्त्यांनी आग्रहाने आणि प्रेमाने साजरा करायचा ठरविले. सुदैवाने हा वाढदिवस संस्था साजरा करीत असलेल्या विवेकानंद जयंती सप्ताहातच येत असल्याने त्याला एक वेगळे परिमाण प्राप्त झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सर्व गुरूदेव कार्यकर्ते हा दिवस ‘ज्ञानशिदोरीदिन’ म्हणून साजरा करीत आहेत. ही संकल्पना साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी आणि त्यांच्या कार्याला पूरक ठरणारी आहे. या दिवशी संस्थाभर ज्ञानाचा उत्सव साजरा केला जातो. बापूजींच्या कार्याचे, तत्त्वज्ञानाचे स्मरण करणारी व्याख्याने, शाखा व ग्रामस्थ यांच्यातील देवाणघेवाण व आपुलकी वाढविणारे उपक्रम या दिवशी साजरे केले जातात. काही ठिकाणी सामाजिक कर्तव्याच्या जाणीवेतून रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. आणि या दिवसातील सर्वात सुंदर उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांना भेट दिली जाणारी पुस्तके. ‘पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक असते’ आणि विद्यार्थी हे संस्कृतीचे वाहक असतात. त्यांचे मस्तक घडविणारे विचार या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचविले जातात. एक प्रकारे संस्कृतीच्या संवर्धन, संरक्षण व संक्रमानासाठी संस्थेने साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेले हे योगदान आहे.

                   बापूजींच्या ध्येयमार्गावरून अथक वाटचाल करून, विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, महाराष्ट्रात शिक्षणाची क्रांती करून, बापूजींचे स्वप्न वास्तवात आणणे हेच अभयकुमार साहेब यांच्या आयुष्याचे ‘व्रत’ आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा नावलौकिक,  संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रगती, संस्थेतील गुरुदेव कार्यकर्त्यांचे हीत आणि समृद्धी हे त्यांच्या कार्याचे व्रत आहे. यासोबतच बापूजींचे विचार, कार्य आणि तत्वज्ञान यांचे संरक्षण, संवर्धन आणि पुढील पिढीकडे संक्रमण हे साहेबांच्या जीवनाचे व्रत आहे. ह्याच सर्व व्रतांसाठी त्यांनी आजपर्यंत आपले संपूर्ण जीवन  वाहिले आहे. खरोखरच एका 'शिक्षणमहर्षीं'चा वारसा समर्थपणे चालवणारे अभयकुमार साळुंखेसाहेब हे खऱ्या अर्थाने 'शिक्षणव्रती' आहेत. साहेबांचे आशीर्वाद, आधार आम्हां सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांच्या पाठीशी अखंड राहावेत, साहेबांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे हीच आज या निमित्ताने बापूजींच्या चरणी विनंती आणि आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.