बापूजीच्या तत्त्वज्ञानाचे आस्तित्वरूप : ‘शिक्षणव्रती’ प्राचार्य अभयकुमार साळुंखे
कॅप्टन डॉ. महेश नारायण गायकवाड
प्र. प्राचार्य, आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, नागठाणे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांचे कुटुंबप्रमुख आदरणीय अभयकुमार साळुंखे साहेब आज वयाची ७९ वर्षे पूर्ण पूर्ण करीत आहेत. अत्यंत आनंदाची भावना आज प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्यांच्या मनात आहे. हा आनंद केवळ अभयकुमार साळुंखे या व्यक्तीच्या वाढदिवसाचा नाही तर कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था या कुटुंबाचे प्रमुख आहेत, या नात्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याला झालेला हा आनंद आहे. संस्थेतील गुरुदेव कार्यकर्त्यांचे हे प्रेम अकृत्रिम आहे.
संस्थेतील प्रत्येक गुरुदेव कार्यकर्ता बापूजींची प्रतिमा अभयकुमार साळुंखे साहेबांच्या वर्तनात, बोलण्यात पहात असतो. साहेबांचा जीवनप्रवास आणि संस्थेचा इतिहास वेगळा करता येत नाही. जन्मापासून आजपर्यंत त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू विवेकानंद शिक्षण संस्था आहे आणि तोच जीवनाचा निदिध्यास आहे. सतत संस्थेच्या प्रगतीचा, संस्थेच्या प्रत्येक शाखेचा रात्रंदिवस विचार करणारे अभयकुमारसाहेब प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्यासाठी वंदनीय आहेत. आयुष्यातील अनेक प्रसंगात त्यांचे मार्गदर्शन घेताना मला त्यांच्याठिकाणी प्रत्यक्ष बापूजींचे दर्शन होते. काही चांगले काम केल्यानंतर साहेबांनी पाठीवर टाकलेल्या थापेमधून बापूजींच्या स्पर्शाची अनुभूती मिळते आणि खात्री पटते की, हा फक्त बापूजींचा रक्ताचा वारसा नव्हे तर बापूजींच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा आणि गुरुदेव कार्यकर्त्यांप्रति बापूजींच्या प्रेमाचा, आपुलकीचाही वारसा आहे.
महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात आभाळाएवढे कार्य करणार्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी उर्फ गोविंद ज्ञानोजीराव साळुंखे आणि संस्थामाता सुशीलादेवी या दांपत्यापोटी १७ जानेवारी १९४६ रोजी अभयकुमार साहेबांचा जन्म झाला. या भाग्या बरोबरच येणाऱ्या जबाबदारीची जाणीव ही त्यांनी आजतागायत आपल्या प्रत्येक कृती आणि उक्तीमधून कायमच सांभाळली आहे. "शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी।।" हे तुकोबारायाचे वचन साहेबांनी आपल्या वर्तनातून सत्य करून दाखविले आहे.
शालेय वयापासून त्यांचा असणारा उमदा, धाडसी, निडर स्वभाव कायमच सर्वांच्या कौतुकाचा विषय होता. शाळा-कॉलेजच्या वयात मित्रमंडळीमध्ये असणारी त्यांची लोकप्रियता म्हणजे जणू त्यांच्यातील नेतृत्वगुणांचीच नांदी होती. १९७१ साली शिवाजी विद्यापीठातून मराठी विषय घेऊन त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर संस्थेत अधिव्याख्याता म्हणून ते रुजू झाले, तेही रीतसर पद्धतीने. तेही इतर प्राध्यापकांप्रमाणे रीतसर मुलाखत देऊन! नोकरी स्वीकारल्यानंतरही त्यांनी संस्थापकांचा मुलगा म्हणून कधीही सवलत घेतली नाही. तशी सवलत घेणे खुद्द बापूजींना ही आवडले नसते, याची जाणीव साहेबांनाही होती. म्हणूनच संस्था प्रशासनाला जिथे त्यांची गरज वाटली, तिथे त्यांनी सेवा केली. जत, कोल्हापूर, मिरज, उस्मानाबाद, तळमावले अशा विविध महाविद्यालयात त्यांनी कसलीही कुरबूर किंवा तक्रार न करता अध्यापन केले. "नोकरीत अट म्हणजे, निष्ठेत घट" हे बापूजींचे वाक्य त्यांनी स्वतः पाळले, म्हणूनच आज हक्काने हे वाक्य ते सांगतात तेव्हा संस्थेतील सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांसाठी ते शिरोधार्य असते.
मराठी विषयाच्या अध्यापनाचे कार्य करीत असतानाच १९७४ साली संस्थेने त्यांची आजीव सेवकपदी निवड केली. त्यानंतर १९७८ साली ते प्राचार्य झाले. त्या दिवसापासून त्यांनी स्वतःमध्ये आश्चर्यकारक बदल घडवून आणला. संस्थेचा प्रत्येक प्रश्न गंभीरपणे, विचारशील, चिंतनशील पद्धतीने समजून घेऊन आणि सर्व सहकार्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक निर्णय घेण्याची स्वतःची एक कार्यपद्धती निर्माण केली, आणि ती आयुष्यभर अमलात आणली. संस्था सेवकांच्या मनावर त्यांच्या प्रशासनाचा एक कधीही न पुसला जाणारा सोनेरी ठसा उमटलेला आहे. संस्थेचे सेक्रेटरी म्हणून संस्थेची धुरा त्यांनी सन १९८५ साली हाती घेतली. शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या ८ऑगस्ट १९८७ रोजी झालेल्या महानिर्वाणानंतर संस्थेतील सर्व पदाधिकारी, गुरुदेव कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांनी प्राचार्य अभयकुमार साहेबांच्यावर विश्वास दाखवला. त्यांच्यामध्ये बापूजींचे अस्तित्व पाहिले. संस्थेचे हे शिवधनुष्य त्यांच्या हाती दिले. २००३ साली त्यांनी संस्थेच्या कार्याध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर काही काळ संस्थेचे अध्यक्षही झाले. या अशा अनेक नात्याने ते संस्थेची धुरा पेलत राहिले. या काळात अनंत अडचणी, सहनशक्तीची परीक्षा घेणारे कठीण प्रसंग व संकटे संस्थेवर येत असताना ते नेहमीच छातीचा कोट करुन समर्थपणे उभे राहिले. "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग।" हे संत वचन ते शब्दशः जगले आहेत.
संस्थेचे नेतृत्व करताना त्यांनी केवळ प्रशासक म्हणून काम केले नाही तर आपल्या स्नेहशील स्वभावामुळे ते संस्थेचे 'कुटुंबप्रमुख' झाले. संस्थेतील गुरुदेव कार्यकर्त्यांनी त्यांना स्वयंस्फुर्तीने आणि मनापासून दिलेले हे स्थान आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ध्येयवादीपणाचा, विचारांचा आणि निर्णयपद्धतीचा संस्कार आणि वसा हाती घेतला, तो आज पर्यंत सांभाळला आहे.
प्राचार्य पदापासून कार्याध्यक्ष पदापर्यंत अनेक पदावर कार्यरत असताना साहेबांनी प्रत्येक निर्णयातून संस्थेचे हित, शैक्षणिक, गुणात्मक प्रगती हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले आणि धोरणे राबविली. कठोर प्रशासकीय निर्णय घेतानाही व्रतस्थ मनाने आणि सारासार विचारानेच निर्णय घेतले कोणत्याही व्रताचा पाया संयम हाच असतो. त्यामुळेच शिक्षणाच्या व्रताला वाहून घेतेलेला एक मुर्तीमंत 'शिक्षणवृत्ती' अभयकुमार साहेबांच्या रूपाने संस्थेस लाभला आहे.
साहेबांच्या स्वभावात असणारी ही सहनशीलता, क्षमाशीलता आणि उदारता सर्वांसाठी आदर्शवत आणि मार्गदर्शक आहे. महात्मा गांधी म्हणत असत "ज्या निर्णयाने समाजातील शेवटच्या माणसाचे कल्याण होत असेल तोच निर्णय योग्य." अभयकुमार साहेबांनी संस्थेच्या बाबतीत कोणतेही निर्णय घेताना हेच सूत्र डोळ्यासमोर ठेवून, संस्थेचे आणि गुरुदेव कार्यकर्त्यांचे कल्याण साधण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. संस्था हितासाठी प्रसंगी कठोर भूमिका घेणारे साहेब, गुरुदेव कार्यकर्त्यांसाठी किती हळवे होतात आणि त्याच्या भल्याचा विचार करतात हे आजपर्यंत अनेकांनी अनुभवले आहे.
साहेबांचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि धीरगंभीर आवाज यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात एक आदरयुक्त दरारा असतो. पण त्यांच्या सहवासात आल्यानंतर दिसते ते त्यांचे नितळ स्वच्छ पाण्यासारखे पारदर्शी मन! संस्थेच्या भल्यासाठी म्हणून त्यांच्या आवाजात बापाची जरब असली तरी गुरुदेव कार्यकर्त्यांना आधार देणारा माऊलीचा हातही त्यांचाच असतो! "वरि घालितो धपाटा। आत आधाराला हात।।" याचे प्रत्यंतर सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांनी अनुभवले आहे.
आज संस्था त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वाटचाल करीत असताना, आधुनिक काळाची आव्हाने पेलत, नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत आहे. यामुळेच आज आपली संस्था उभ्या महाराष्ट्रासाठी एक शैक्षणिक प्रयोगशाळा बनली आहे. संस्थेच्या प्रत्येक शाखेवर अभयकुमार साहेबांचे पुत्रवत प्रेम आहे. संस्थेच्या शाळा-कॉलेजच्या कोणत्याही शाखेचे प्रश्न, अडचणी त्यांना सदैव स्मरणात असतात. म्हणूनच शाखांना मदत करणारे स्थानिक ग्रामस्थ म्हणजे साहेबांच्या गळ्यातील ताईत असतात. विभागीय बैठकीत साहेब ज्या आदराने आणि सन्मानाने प्रत्येक ग्रामस्थांचे बोलणे ऐकतात, त्याला महत्त्व देतात, यावरून त्यांच्या मनातील ग्रामस्थांना विषयी असणारा आदर लक्षात येतो. ही त्यांच्या आगळ्यावेगळ्या प्रशासनाची खासियत आहे.
"जया शिरी कारभार। बुद्धी सार तयाची।।" या संत वचनाप्रमाणे संस्थेचा कारभार स्वतःच्या शिरावर घेत असताना त्यांचा संयम आणि सहनशीलता खरोखर विस्मय वाटावा एवढी प्रचंड आहे. जवळपास साडे दहा हजार सेवक, त्याचे प्रश्न, शाखांच्या समस्या, अडचणी, राजकीय हस्तक्षेप आणि प्रचंड दबाव, शासकीय नियम आणि कायद्याची बंधने या सर्वांतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी 'संयम' आणि 'सहनशीलते'चा वापर केला. त्यांची 'दूरदृष्टी' आणि त्याबरोबरच स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लागणारे कठोर परिश्रम आणि त्याग ही अभयकुमार साहेबांच्या यशस्वी प्रशासनाची मूलभूत सूत्रे आहेत असे मला वाटते.
अभयकुमार साहेबांचे वक्तृत्व ही गुरुदेव कार्यकर्त्यांसाठी एक बौद्धिक मेजवानीच असते. त्यांच्या वक्तृत्वाला बापूजींच्या तत्वज्ञानाची ठाम बैठक असते. विचारांचा स्पष्टपणा, चांगल्याचे मनसोक्त कौतुक आणि या सर्वावर नर्म विरोधाचा शिडकावा आणि ऐकणाऱ्याला प्रत्येक वेळी एक तरी नवा विचार देणारे असे त्यांचे भाषण असते. त्यांच्या प्रत्येक भाषणातून संस्था प्रगतीचे नवे आयाम, नवी स्वप्ने, नवी ध्येये गुरुदेव कार्यकर्त्यांसमोर उभे राहत असतात. त्यांच्या वाणीतून आणि वक्तृत्वातुन नेहमीच पूज्य बापूजींचे अस्तित्व प्रत्ययाला येत असते.
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्याजन्मशताब्दी वर्षाच्या नियोजनामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे 'शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे जन्मशताब्दी गौरवग्रंथ - विवेकदीप'. या गौरव ग्रंथाचे कार्यकारी संपादक म्हणून साहेबांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली. साहेबांनी दाखवलेला हा विश्वास माझ्यासाठी अनमोल आहे. ग्रंथाच्या निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर साहेब जातीने लक्ष घालीत होते. मार्गदर्शन करीत होते. आणि प्रत्येक वेळी माझा विश्वास वाढवीत होते. त्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे हा गौरव ग्रंथ पूर्णत्वास गेला. एक दर्जेदार संदर्भ ग्रंथ म्हणून तो आकाराला आला. माझ्यासारख्या धडपडणार्या गुरुदेव कार्यकर्त्याला साहेबांनी एक प्रकारे दिलेला हा मोठा सन्मान होता. काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे अशा पद्धतीने बळ वाढवणे हीच साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे आणि वेगळेपण आहे.
संस्था स्थापन झाल्यापासून बापूजींच्या महानिर्वाणापर्यंत तीन दशकांचा काळ हा पूज्य बापूजींचा नेतृत्वाखालील संस्थेच्या उभारणीचे एक पर्व आहे. तर त्यानंतरची पुढील चार दशके अभयकुमार साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला संस्थेचा उत्कर्ष आणि विकास, हे संस्थेच्या इतिहासातील दुसरे पर्व आहे. बापूजींनी लावलेल्या रोपट्याचा त्यांनी रक्त आणि घामाचे शिंपण करून वटवृक्ष केला आहे.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करीत स्वतःला सिद्ध करीत आणि बापूजींच्या तत्त्वज्ञानावर अढळ निष्ठा ठेवीत मार्गक्रमण करणारे साहेब आमच्यासारख्या गुरुदेव कार्यकर्त्यांसाठी महान आदर्श आहेत. बापूजींच्या ध्येयमार्गावरून अथक वाटचाल करून, विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, महाराष्ट्रात शिक्षणाची क्रांती करून, बापूजींचे स्वप्न वास्तवात आणणे हेच अभयकुमार साहेब यांच्या आयुष्याचे ‘व्रत’ आहे. खरोखरच एका 'शिक्षणमहर्षीं'चा वारसा समर्थपणे चालवणारे अभयकुमार साळुंखेसाहेब हे खऱ्या अर्थाने 'शिक्षणव्रती' आहेत.
अवघ्या महाराष्ट्राला प्रकाशमान करणाऱ्या पाटणच्या कोयनेच्या पाण्याची ऊर्जा आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीला अखंड अभिषेक करणाऱ्या पंचगंगेच्या पाण्याचे पवित्र्य साहेबांच्या व्यक्तीमत्वात एकवटलेले आहे. म्हणूनच या दोन्ही जीवनदायिनींप्रमाणे साहेबांचा जीवन प्रवाह देखील त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाचे जीवन समृद्ध करीत अखंड वाहत आहे. आणि यापुढेही शतकोत्तर तो असाच अखंड वाहत राहावा साहेबांचे आशीर्वाद आम्हां सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांच्या पाठीशी अखंड राहावा, साहेबांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे हीच आज या निमित्ताने बापूजींच्या चरणी विनंती आणि परमेश्वराकडे प्रार्थना.
सुंदर लेख.
ReplyDeleteआदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🙏
खूप छान आणि सुंदर लेख ... आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏
ReplyDelete