Sunday, 16 January 2022

विवेकानंद संस्थेची 'अक्षय ज्ञानशिदोरी' - प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब.


विवेकानंद संस्थेची 'अक्षय ज्ञानशिदोरी' - प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब.
                                - प्रा. डॉ. महेश गायकवाड                                             - व्यवस्थापक मंडळ सदस्य
                           श्री स्वा. वि. शिक्षण संस्था, कोल्हापूर

            श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, विवेकानंद परिवाराचे कुटुंबप्रमुख मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब आज वयाच्या ७७ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. ‘आजी सोनियाचा दिनु। वर्षे अमृताचा घनु।।’ अशी भावना आज प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्यांच्या मनात आहे. हा आनंद केवळ अभयकुमार साळुंखे या व्यक्तीच्या वाढदिवसाचाच नाही, तर साहेब संस्था कुटुंबाचे प्रमुख आहेत, या नात्याने झालेला हा आनंद आहे. संस्थेतील गुरुदेव कार्यकर्त्यांचे साहेबांच्यावरील हे प्रेम अकृत्रिम आहे. संस्थेच्या कोणत्याही शाखेवर साहेबांबरोबर जाण्याचा योग आला, की संस्थेतील शिपायापासून ते मुख्याध्यापक-प्राचार्यापर्यंत प्रत्येक गुरूदेव कार्यकर्त्याचे साहेबांवरील अकृत्रिम प्रेम लक्षात येते. या भेटीवेळी मुख्य कार्यक्रमानंतर साहेब जेंव्हा गुरूदेव कार्यकर्त्यांशी मनमोकळा आणि स्नेहशील संवाद साधतात आणि प्रत्येकाची आस्थेने नाव, गाव, सेवा, अडीअडचणी याबद्दल चर्चा करतात त्या वेळी प्रत्येक सेवकाचा ऊर साहेबांच्यावरील प्रेमाने भरून येतो. हा प्रसंग खरोखरच अनुभवण्यासासारखा असतो. यापाठीमागची वडीलकीची, आपुलकीची भावना अनुभवताना, त्यांच्याठिकाणी फक्त अभयकुमारसाहेबच दिसत नाहीत, तर त्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष बापूजींचे दर्शन होते.

              महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात आभाळाएवढे कार्य करणार्‍या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी उर्फ गोविंद ज्ञानोजीराव साळुंखे आणि संस्थामाता सुशीलादेवी या दांपत्यापोटी १७ जानेवारी १९४७ रोजी अभयकुमार साहेबांचा जन्म झाला. हे त्यांचे भाग्य तर आहेच, पण या भाग्या बरोबरच येणाऱ्या जबाबदारीची जाणीव ही त्यांनी आजतागायत आपल्या प्रत्येक कृती आणि उक्तीमधून कायमच सांभाळली आहे. "शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी।।" हे तुकोबारायाचे वचन साहेबांनी आपल्या वर्तनातून सत्य करून दाखविले आहे. आज विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वाटचालीचा मी विचार करतो, त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि  प्राचार्य अभयकुमार साळुंखे दोघेही एकाच वेळी उभे राहतात. संस्थेतील प्रत्येक गुरुदेव कार्यकर्ता बापूजींची प्रतिमा अभयकुमार साळुंखे साहेबांच्या वर्तनात, बोलण्यात पहात असतो. साहेबांचा जीवनप्रवास आणि संस्थेचा इतिहास वेगळा करता येत नाही. जन्मापासून आजपर्यंत त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू विवेकानंद संस्था आहे आणि तोच जीवनाचा निदिध्यास आहे  सतत संस्थेच्या प्रगतीचा, संस्थेच्या प्रत्येक शाखेचा रात्रंदिवस विचार करणारे अभयकुमारसाहेब म्हणूनच सर्वांसाठी वंदनीय आहेत. माझ्या आयुष्यातील अनेक प्रसंगात त्यांचे अचूक मार्गदर्शन, काही चांगले काम केल्यानंतर साहेबांनी पाठीवर टाकलेल्या थापेमधून बापूजींच्या स्पर्शाची अनुभूती मिळते आणि खात्री पटते की, हा फक्त बापूजींचा रक्ताचा वारसा नव्हे तर बापूजींच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा आणि गुरुदेव कार्यकर्त्यांप्रति बापूजींच्या प्रेमाचा आपुलकीचाही वारसा आहे.

            शालेय वयापासून त्यांचा असणारा उमदा, धाडसी, निडर स्वभाव कायमच सर्वांच्या कौतुकाचा विषय होता. शाळा-कॉलेजच्या वयात मित्रमंडळीमध्ये असणारी त्यांची लोकप्रियता म्हणजे जणूकाही त्यांच्यातील नेतृत्वगुणांचीच नांदी होती. विद्यालयीन जीवनात त्यांनी विविध खेळाची, कुस्तीची आणि अभिनयाचीही आवड जोपासली होती. यातूनच उमदा स्वभाव आयुष्यातील प्रत्येक घटनेकडे खिलाडू वृत्तीने पाहण्याची सवय निर्माण होत गेली. १९६८ साली विवेकानंद महाविद्यालयातून बी.ए. आणि १९७१ साली शिवाजी विद्यापीठातून मराठी विषय घेऊन त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर संस्थेत अधिव्याख्याता म्हणून ते रुजू झाले. प्राध्यापक म्हणून संस्थेच्या विविध शाखांवर सेवा करीत असताना विद्यार्थ्यांचे अलोट प्रेम त्यांनी संपादन केले. खरेतर विद्यार्थीप्रिय प्राध्यापक हीच त्यांची खरी ओळख आहे. मराठी विषयाच्या अध्यापनाचे कार्य जीव ओतून करीत असतानाच १९७४ साली संस्थेने त्यांची आजीव सेवकपदी निवड केली. त्यानंतर १९७८ साली ते प्राचार्य झाले. त्या दिवसापासून त्यांनी स्वतःमध्ये आश्‍चर्यकारक बदल घडवून आणला. संस्थेचे सेक्रेटरी म्हणून संस्थेची धुरा त्यांनी सन  १९८५ साली हाती घेतली. शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या ८ऑगस्ट  १९८७ रोजी झालेल्या महानिर्वाणानंतर संस्थेतील सर्व पदाधिकारी, गुरुदेव कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांनी प्राचार्य अभयकुमार साहेबांच्यावर विश्वास दाखवला. त्यांच्यामध्ये बापूजींचे अस्तित्व पाहिले. संस्थेचे हे शिवधनुष्य त्यांच्या हाती दिले. २००३ साली त्यांनी संस्थेच्या कार्याध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर काही काळ संस्थेचे अध्यक्षही झाले. या अशा अनेक नात्याने ते संस्थेची धुरा पेलत राहिले. या काळात अनंत अडचणी, सहनशक्तीची परीक्षा घेणारे कठीण प्रसंग व संकटे संस्थेवर येत असताना ते नेहमीच छातीचा कोट करुन समर्थपणे उभे राहिले. "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग।" हे संत वचन ते शब्दशः जगले आहेत.

            संस्थेचा प्रत्येक प्रश्न गंभीरपणे, विचारशील, चिंतनशील पद्धतीने समजून घेऊन आणि सर्व सहकार्‍यांना विश्वासात घेऊन प्रत्येक निर्णय घेण्याची स्वतःची एक कार्यपद्धती निर्माण केली, आणि ती आयुष्यभर अमलात आणली. संस्था सेवकांच्या मनावर त्यांच्या प्रशासनाचा एक कधीही न पुसला जाणारा सोनेरी ठसा उमटलेला आहे. आपल्या नावाप्रमाणेच सर्वांना 'अभय' देणारे साहेब स्वतःही सर्व भय आणि दबावाच्या पलीकडे आहेत. जे स्वतःला पटेल आणि जे संस्थेच्या हिताचे आहे, तेच निर्णय त्यांनी ठामपणे घेतले आहेत, घेत आहेत.

प्राचार्य पदापासून कार्याध्यक्ष पदापर्यंत अनेक पदावर कार्यरत असताना साहेबांनी प्रत्येक निर्णयातून संस्थेचे हित, शैक्षणिक, गुणात्मक प्रगती हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले आणि धोरणे राबविली. कठोर प्रशासकीय निर्णय घेतानाही व्रतस्थ मनाने आणि सारासार विचारानेच निर्णय घेतले कोणत्याही व्रताचा पाया संयम हाच असतो. त्यामुळेच शिक्षणाच्या व्रताला वाहून घेतेलेला एक  मुर्तीमंत 'शिक्षणवृत्ती' अभयकुमार साहेबांच्या रूपाने संस्थेस लाभला आहे.
"सुखी संतोषा न यावे। दुःखी विषादा न भजावे।
आणि लाभालाभ न धरावे। मनामाजी।।"
ज्ञानदेवांच्या या ओवी प्रमाणेच मानसन्मान सुख-दुःख, आनंदाचे प्रसंग, परीक्षा घेणारे समर प्रसंग अशा सार्‍या प्रसंगातही ते कायम अविचल शांत राहिले. आपल्यावर प्रेम करणाऱ्यांना सोबत घेऊन आणि कोणी वेगळा विचार करीत असेल तर त्याला प्रेमाने जिंकून साहेबांनी प्रत्येकाला संस्थेच्या प्रवाहात प्रवाहित केले. साहेबांच्या स्वभावात असणारी ही सहनशीलता, क्षमाशीलता आणि उदारता सर्वांसाठी आदर्शवत आणि मार्गदर्शक आहे. महात्मा गांधी म्हणत असत "ज्या निर्णयाने समाजातील शेवटच्या माणसाचे कल्याण होत असेल तोच निर्णय योग्य." अभयकुमार साहेबांनी संस्थेच्या बाबतीत कोणतेही निर्णय घेताना हेच सूत्र डोळ्यासमोर ठेवून, संस्थेचे आणि गुरुदेव कार्यकर्त्यांचे कल्याण साधण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. संस्था हितासाठी प्रसंगी कठोर भूमिका घेणारे साहेब, गुरुदेव कार्यकर्त्यांसाठी किती हळवे होतात आणि  त्याच्या भल्याचा विचार करतात हे आजपर्यंत अनेकांनी अनुभवले आहे.

            अभयकुमार साहेबांचे वक्तृत्व ही गुरुदेव कार्यकर्त्यांसाठी एक बौद्धिक मेजवानीच असते. त्यांच्या वक्तृत्वाला बापूजींच्या तत्वज्ञानाची ठाम बैठक असते. व्यवहारी अनुभवाचे दाखले, कधीकधी परखडतेकडे झुकणारा विचारांचा स्पष्टवक्तेपणा, चांगल्याचे मनसोक्त कौतुक करणारे आणि या सर्वावर नर्म विरोधाचा शिडकावा करणारे, असे त्यांचे भाषण असते. विचारप्रगल्भ आणि ऐकणाऱ्याला प्रत्येक वेळी एक तरी नवा विचार देणारे असे त्यांचे भाषण असते. हा विचार नेहमीच श्रोत्यांच्या विचार करायला गतिमान करणारा असतो. प्रत्येक भाषणातून एखादा तरी नवा विचार, बापूजींचा नवा पैलू दाखवणारा प्रसंग यात असतो. त्यांच्या प्रत्येक भाषणातून संस्था प्रगतीचे नवे आयाम, नवी स्वप्ने, नवी ध्येये गुरुदेव कार्यकर्त्यांसमोर उभे राहत असतात. त्यांच्या वाणीतून आणि वक्तृत्वातुन नेहमीच पूज्य बापूजींचे अस्तित्व प्रत्ययाला येत असते. संस्था स्थापन झाल्यापासून बापूजींच्या महानिर्वाणापर्यंत तीन दशकांचा काळ हा पूज्य बापूजींचा नेतृत्वाखालील संस्थेच्या उभारणीचे एक पर्व आहे. तर त्यानंतरची पुढील तीन दशके अभयकुमार साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला संस्थेचा उत्कर्ष आणि विकास, हे संस्थेच्या इतिहासातील दुसरे पर्व आहे. बापूजींनी लावलेल्या रोपट्याचा त्यांनी रक्त आणि घामाचे  शिंपण करून वटवृक्ष केला आहे.

                 साहेबांच्या पंचाहत्तरीनिमित्ताने सर्व गुरूदेव कार्यकर्त्यांनी उत्साहाने आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात साहेबांनी केलेले भाषण हा त्यांच्या सुसंकृत आणि विनयशील स्वभावाचा एक उत्तम नमुना होता. त्यावेळी साहेब म्हणाले होते, “माझा वाढदिवस हे एक निमित्त समजा पण या निमित्ताने सर्व समाजाचे आणि गुरुदेव कार्यकर्त्यांचे जे अकृत्रीम प्रेम मी पाहतो आहे ते माझ्यासाठी अनमोल आहे. आज आपण मला ‘कुटुंबप्रमुखा’चे स्थान देता आहात. माझ्या वयोमानाप्रमाणे ते योग्यही असेल पण मला हा उल्लेख ऐकताना याचे समाधान वाटते की, आपण सर्वजन स्वत:ला विवेकानंद शिक्षण संस्था या कुटुंबाचे एक घटक मानता आहात. ही कौटुंबिक प्रेमाची भावना मला सुखावणारी आह. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या पोटी माझा जन्म झाला. जन्माने मी जरी त्यांचा वारस असलो तरी मला पूर्णपणे याची जाणीव आहे की, बापुजींच्या बरोबर आणि बापुजींच्या नंतर त्यांच्या कार्यावर श्रद्धा ठेऊन संस्था उभारणीसाठी तन, मन, धन अर्पण करून कार्य करणारे हजारो गुरुदेव कार्यकर्ते हे बापुजींच्या विचाराचे खरे वारसदार आहेत. मी त्यांचा एक प्रतिनिधी, एक विश्वस्त आहे. महात्मा गांधी यांनी सामाजिक जीवनातील विश्वस्त ही संकल्पना सर्वात प्रथम आपल्या ‘हिंद स्वराज’ या पुस्तकात मांडली. हीच संकल्पना संस्थेच्या प्रशासानाबाबातीत आणि आर्थिक व्यवहाराबाबतीत बापूजी साळुंखे यांनी स्वत: अंगिकारली आणि त्याचाच संस्कार माझ्यावर झालेला आहे, त्याप्रमाणे वागण्याचा मी नेहमी प्रयत्न करीत आलो आहे.”

               स्वतःचा वाढदिवस कधीही साजरा न करणाऱ्या साहेबांचा वाढदिवस २०१९-२० सालापासून म्हणजे बापूजींच्या जन्मशताब्दीपासून सर्व गुरूदेव कार्यकर्त्यांनी आग्रहाने आणि प्रेमाने साजरा करायचा ठरविले. सुदैवाने हा वाढदिवस संस्था साजरा करीत असलेल्या विवेकानंद जयंती सप्ताहातच येत असल्याने त्याला एक वेगळे परिमाण प्राप्त झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सर्व गुरूदेव कार्यकर्ते हा दिवस ‘ज्ञानशिदोरीदिन’ म्हणून साजरा करीत आहेत. ही संकल्पना साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी आणि त्यांच्या कार्याला पूरक ठरणारी आहे. या दिवशी संस्थाभर ज्ञानाचा उत्सव साजरा केला जातो. बापूजींच्या कार्याचे, तत्त्वज्ञानाचे स्मरण करणारी व्याख्याने, शाखा व ग्रामस्थ यांच्यातील देवाणघेवाण व आपुलकी वाढविणारे उपक्रम या दिवशी साजरे केले जातात. काही ठिकाणी सामाजिक कर्तव्याच्या जाणीवेतून रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. आणि या दिवसातील सर्वात सुंदर उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांना भेट दिली जाणारी पुस्तके. ‘पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक असते’ आणि विद्यार्थी हे संस्कृतीचे वाहक असतात. त्यांचे मस्तक घडविणारे विचार या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचविले जातात. एक प्रकारे संस्कृतीच्या संवर्धन, संरक्षण व संक्रमानासाठी संस्थेने साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेले हे योगदान आहे.

                   बापूजींच्या ध्येयमार्गावरून अथक वाटचाल करून, विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, महाराष्ट्रात शिक्षणाची क्रांती करून, बापूजींचे स्वप्न वास्तवात आणणे हेच अभयकुमार साहेब यांच्या आयुष्याचे ‘व्रत’ आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा नावलौकिक,  संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रगती, संस्थेतील गुरुदेव कार्यकर्त्यांचे हीत आणि समृद्धी हे त्यांच्या कार्याचे व्रत आहे. यासोबतच बापूजींचे विचार, कार्य आणि तत्वज्ञान यांचे संरक्षण, संवर्धन आणि पुढील पिढीकडे संक्रमण हे साहेबांच्या जीवनाचे व्रत आहे. ह्याच सर्व व्रतांसाठी त्यांनी आजपर्यंत आपले संपूर्ण जीवन  वाहिले आहे. खरोखरच एका 'शिक्षणमहर्षीं'चा वारसा समर्थपणे चालवणारे अभयकुमार साळुंखेसाहेब हे खऱ्या अर्थाने 'शिक्षणव्रती' आहेत. साहेबांचे आशीर्वाद, आधार आम्हां सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांच्या पाठीशी अखंड राहावेत, साहेबांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे हीच आज या निमित्ताने बापूजींच्या चरणी विनंती आणि आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.

13 comments:

  1. अप्रतिम लेख... अभिनंदन...!

    ReplyDelete
  2. लेख फारच छान व अप्रतिम अशी विचारांची गुंफण झाली आहे गुरू.....💐💐💐 आपले मन:पूर्वक अभिनंदन व मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ....🎂🎂💐💐🎂🎂

    ReplyDelete
  3. प्रा.नीलेश जाधव, (हिंदी विभाग)
    श्री संत गाडगेबाबा महाविद्यालयात,कापशी

    ReplyDelete
  4. डॉक्टर गायकवाड सर आपण आदरणीय साळुंखे साहेबांच्या व्यक्तिमत्वातील अनेक कंगोरे सचित्र उभे केले आहेत. साळुंके साहेबांचे त्यागमय जीवन शिक्षणाप्रती असणारी अस्था, पू.बापूजींच्या विचारांचा प्रभाव, गुरुदेव कार्यकर्त्यांचे आधारवड, अशा अनेक अंगांनी आपण साहेबांच्या कर्तुत्वाचे विचारूपी सिंचन या लेखातून केले आहे .एक ऐतिहासिक दस्तऐवज ठरावा असा सुंदर हा लेख आहे. आपले मनापासून अभिनंदन अभिनंदन.

    ReplyDelete
  5. अप्रतिम लेख सर ... आपले मनःपूर्वक अभिनंदन व माननीय प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...🙏🙏

    ReplyDelete
  6. खूप सुंदर लेख! सर आपण आदरणीय अभयकुमार साहेबांविषयी अतिशय छान माहिती दिली आहे, या लेखातून साहेबांच्या व्यक्तिमत्वाची पूर्ण ओळख झाली. आपले हार्दिक अभिनंदन आणि साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

    - प्रा. डॉ. मोरगे एस. बी.

    ReplyDelete
  7. खुप सुंदर लेख आहे

    ReplyDelete
  8. सर खूप छान माहिती आहे, यानिमित्ताने साहेबांची ओळख सर्व गुरुदेव कार्यकर्ते यांना होईल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

    ReplyDelete
  9. सुंदर लेख.....प्रत्यक्ष व्यक्तिमत्त्व .... साहेबांना उदंड आयुष्य लाभो,....,

    ReplyDelete
  10. खुपच छान....

    अप्रतिम लेख

    ReplyDelete
  11. खूपच छान, अप्रतिम 👍👍

    ReplyDelete
  12. डॉक्टर साहेब आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. शिक्षणासाठी या, सेवेसाठी जा. हा एकमेव मूलमंत्र जपणारे व्यक्तिमत्व माननीय अभयकुमारजी साळुंखे साहेब व्यक्तिमत्वातील अनेक कंगोरे सचित्र उभे केले आहेत. साळुंके साहेबांचे त्यागमय जीवन शिक्षणाप्रती असणारी अस्था, पू.बापूजींच्या विचारांचा प्रभाव, गुरुदेव कार्यकर्त्यांचे आधारवड, अशा अनेक अंगांनी आपण साहेबांच्या कर्तुत्वाचे विचारूपी सिंचन या लेखातून केले आहे .एक ऐतिहासिक दस्तऐवज ठरावा असा सुंदर हा लेख आहे. आपले मनापासून अभिनंदन अभिनंदन.

    ReplyDelete