ल(य)ता(ला) चा सुरेल प्रवास !
लतादीदींचे अभिष्टचिंतन...!
- डॉ. महेश गायकवाड
संगीत ही भारतीय संस्कृतीने श्वासोच्छावासाइतकी जपलेली नैसर्गिक गोष्ट आहे. संपूर्ण भारतीय समाज संगीतमय झालेला समाज आहे. इथं मूल जन्माला येतं त्यावेळी कुणीतरी गात असतं आणि माणूस मरतो त्यावेळीही कुणीतरी गातच असतं. आयुष्यात एखादीतरी ओळ गुणगुणली नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. गाणं हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. अशा भारतीय समाजाच्या संगीतासाठी आसुसलेल्या कानांचे कोडकौतुक पूरवण्यासाठी प्रत्यक्ष संगीताच्या देवीने अवतार घ्यावा तशी गेली जवळजवळ आठ दशके लता मंगेशकर नावाची एक गानसरस्वती संपूर्ण संगीत विश्व आपल्या मधाळ आवाजाने व्यापून टाकते आहे. कधी आईच्या मायेने जवळ घेणारा, कधी बहिणीच्या नात्याने गोंजारणारा, तर कधी प्रियकर - प्रेयसीची व्याकूळता व्यक्त करणारा आणि तेवढ्याच ताकतीने ग्यानबा - तुकोबाची संतवाणी किंवा मीरेच्या भजनातील आर्तता दाखवणारा हा आवाज आता आमचा मानसिक आधार बनला आहे!
२८ सप्टेंबर रोजी लतादीदी वयांची ९२ वर्षे पूर्ण करताहेत. वाढलेल्या वयाचा कोणताही मागमूस नसलेला तो आवाज आजही तसाच आहे. मराठी रंगभूमीवरील प्रसिध्द गायक, लतादीदींचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या समृध्द गायकीचा वारसा त्यांना जन्माने मिळाला असावा. लहानपणी अंगणात खेळत असलेल्या लताने, चुकीच्या पध्दतीने गात असलेल्या दीनानाथांच्या विद्यार्थ्याला पळत घरात जाऊन ‘पूरिया धनाश्री' राग बरोबर गाऊन दाखवण्यास सुरुवात केली. वडील दीनानाथांनी ते ऐकले आणि लताचे संगीत गुण आणि समज त्यांनी ओळखली त्या दिवसापासून लतांची संगीताची शिकवणी सुरु झाली . निसर्गाने दिलेल्या ईश्वरी आवाजाबरोबरच लतादीदींनी कठोर परीश्रम आणि अखंड रियाज करीत अनेक गुरुंकडून ज्ञान मिळवीत या आवाजाला पैलू पाडले.
वयाच्या तेराव्या वर्षी चित्रपटातील पार्श्वगायनाची सुरुवात केल्यापासून आजपर्यंतची त्यांची गाणी म्हणजे चित्रपट सृष्टीचा इतिहास आहे. जगभरातल्या जवळजवळ बावीस भाषातून त्यांनी गाणी गायली आहेत आणि ही प्रत्येक भाषा आत्मसात करण्यासाठी कष्ट केलेले आहेत. निव्वळ हिंदी, उर्दू आणि संस्कृत भाषांच्या उच्चारावर प्रभूत्व मिळवण्यासाठी त्यांनी आयुष्यातले कित्येक तास आणि दिवस खर्ची घातले आहेत.
१९४७ साली भारताच्या स्वातंत्र्याबरोबर लतादीदींची संगीतमय कारकिर्द बहरु लागली होती. अनिल विश्वास, सी. रामचंद्र , रोशनलाल , मदनमोहन यांसारख्या जुन्या संगीतकारांपासून ते अलीकडच्या राम - लक्ष्मण, जतीन-ललीत, ए.आर रहमान पर्यंतच्या संगीतकारांच्या अनेक पीढ्यांबरोबर त्यांनी काम केले आहे. रफी, मुकेश, किशोरकुमार, मन्ना डे, हेमंतकुमार, गीता दत्त, शमशाद बेगम, आशा भोसले यांसारख्या गायक - गायिकांबरोबर अनेक अविस्मरणीय गाणी गायली आहेत 'आयेगा आनेवाला' पासून ते अगदी 'दीदी तेरा देवर दिवाना' पर्यत अनेक हिंदी गाणी रसिकांच्या ओठावर खेळत असतात आणि मराठीत त्यांनी गायिलेली हजारो गाणी हा तर मराठी माणसासाठी अमूल्य ठेवाच आहे .
'या चिमण्यांनो परत फिरारे', 'मालवून टाक दीप', 'श्रावणात घन निळा बरसला' ही गाणी किंवा ज्ञानदेवांची अभंगवाणी असणारी ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा', 'आजी सोनीयाचा दिनू' अशी गाणी असोत किंवा 'खुलवीते मेंदी माझा रंग गोरापाण, ' किंवा 'किती जीवाला राखायचं' अशी लावण्याची खाण असणारी मराठी लावणी असो किंवा अंगावर रोमाचं उभे करणारे ‘जयोस्तुते श्री महन्मंगले' असो किंवा स्वत: लतादीदींनी 'आनंदघन' नावाने स्वरसाज चढवलेले 'ऐरणीच्या देवा' किंवा 'बाई बाई मनमोराचा' असो. आठवायला बसलं तर दीदींची हजारो मराठी, हिंदी गाणी भोवताली फेर धरु लागतात. त्यांनी गायलेल्या गाण्यांचा नुसता आढावा घ्यायचा म्हटलं तर त्यावर एक स्वतंत्र पुस्तक तयार होईल!
पण हे लिहीताना माझी भूमीका अभ्यासकाची नाहीच. संगीत तज्ज्ञाची तर नाहीच नाही. ती भूमीका आहे संगीत देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या अजाण पण भावीक वारकऱ्याची, आध्यात्म कळो ना कळो वारकऱ्याला जशी परब्रम्हाच्या दर्शनाची ओढ असते तशी लतादिदींच्या आवाजाची आणि गाण्याची एक अनावर ओढ मनात कायम जाणवत असते!
लतादीदींनी गायलेली भक्ती गीते ऐकताना किंवा 'ज्योती कलश छलके' सारखं रागदारीवर आधारीत गाणं ऐकताना वाटतं. प्रत्यक्ष भगवंतांनीच तीच्या गळ्यात बासरीचे सुर ओतले असावेत. त्यामुळे त्या गळ्यातून निघणारा 'गांधार' ईश्वरीच असणार! आणि हा आवाज ऐकणं यापेक्षा ईश्वराच्या अस्तित्वाची वेगळी प्रचिती ती काय असणार! लता दीदींनीही आपले गायन एखाद्या तपश्चर्येप्रमाणे जपले आहे, वाढवले आहे. दीदी ज्यावेळी जगात कुठेही रंगमंचावर गाणे गाण्यासाठी येतात त्यावेळी पायात चपला घालीत नाहीत आणि त्यांच्या आगमनाबरोबर समोरचा हजारोंचा श्रोतृवर्ग मग तो भारतातला असो वा परदेशातला, मंत्रमुग्ध होवून आपोआप उभा राहतो!
आजपर्यंत त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले आहेत. फिल्मफेअर पुरस्कार तर शेवटी नवीन गायीकांना संधी मिळावी म्हणून स्वीकारायचा बंद केला. दादासाहेब फाळके पुरस्कारांपासून ते 'भारतरत्न' पर्यत शेकडो पुरस्कार मिळवूनही त्या मात्र आजपर्यत लता मंगेशकर'च राहिल्या! आणि त्यामुळेच आज लता मंगेशकर' हीच या संगीत क्षेत्रातली सर्वोच्च पदवी झाली आहे!
लतादीदींचे गाणे हा विषय संगीताची आवड असणाऱ्या कोणत्याही माणसाला बोलताना कधीही कंटाळा न येणारा आणि कितीही बोलले तरी बोलून न संपणारा विषय! पण सुगंध हा जसा अनुभवायचा विषय आहे तसे लतादीदींचे गाणे हा अनुभवायचा विषय आहे . म्हणून दीदींच्या वाढदिवशी आपण ईश्वराला प्रार्थना करुया की, 'हा लय तालाचा सुरेल प्रवास असाच अखंड चालू राहू देत !'
Wonderful words for devoted singer.... Very catchy title sir... Congrats.
ReplyDeleteThanks Sunil Sir👍
Deleteअप्रतिम, अभ्यासपूर्वक, चिंतनीय लेखन ... संगीत क्षेत्रातल्या साधका पेक्षाही खूप अभ्यास पूर्वक लेखन खूप धन्यवाद...
DeleteVery nice
ReplyDeleteThanks ��
Deleteअष्टपैलू लेखन सम्राट
Deleteखूपच सुंदर लिखाण
प्रत्येक शब्द जबरदस्त अर्थपूर्ण सर जी
Very nicely and perfectly expressed Lataji..I think you wrote about her singing life absolutely true and perfect...
ReplyDeleteThank you very much for your encouraging comment 👍👍
DeleteGreat words sir
ReplyDeleteThanks 👍👍
Deleteसर,
ReplyDeleteअप्रतिम, खूपच छान.
धन्यवाद👍👍
DeleteThis comment has been removed by the author.
DeleteThanks sir
ReplyDeleteखूप सुंदर मांडणी केली आहे.
ReplyDeleteधन्यवाद👍
Deleteखुपच छान. दिवसभरात खुप लेख वाचून झाले पण हे वाचून कमी शब्दांत अचूक माहिती समजली.
ReplyDeleteमनापासून आभार🙏👍
Deleteखूप सुंदर
ReplyDelete👌🏼👌🏼 सर कमी शब्दात खुप समर्पक माहिती दिली आहे🙏🙏
ReplyDeleteवयाच्या केवळ तेराव्या वर्षी सुरु झालेला दिदींचा संगीतमय प्रवास आजतागायत आसमंत निनादत आहे.
आचार्य अत्रेंना लताबाईं बद्दल लिहायला सांगितल तेंव्हा अत्रे म्हणतात :-
केवळ लोखंडाच्या निफातून उतरल्या शाईनं, जाड्या भरड्या कागदावर लताला अभिवादन करणं म्हणजे एखादया अप्सरेच्या मृदुल चरणकमला खाली गोणपाटाच्या पायघड्या अंथरण्यासारखं आहे..
दिदींच्या प्रतिभेला साजेसं अभिवादन करायचं असेल तर......
पहाटकाळची कोवळी सुवर्ण किरणं दवबिंदूमध्ये भिजवून कमलतंतू च्या लेखणी ने फुलपाखराच्या पंखावर लिहिलेलं मानपत्र तिला गुलाब कळीच्या करंडकातून अर्पण करायला हवं .. लताचा आवाज हा मानवी सुष्ठीतला एक अद्भुत चमत्कार आहे..
साक्षात विधात्याला असा चमत्कार पुन्हा घडवता येणार नाही
श्रीकृष्णाच्या मुरलीचा साद ,उर्वशीच्या नुपुरांची रुणझुण आणि सरस्वतीच्या वीणेचा झंकार हे तिन्ही एकवटून विधात्याने आपल्या लताचा कंठ घडवला असेल .. सूर ,लय ,ताल ,सिद्धी आणि प्रसिद्धी या गोष्टी जिथे एकत्र येतात त्या जागेला आपण लता मंगेशकर अस म्हणावं...
सविस्तर आणि माहितीपूर्ण प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार🙏👍
Delete👌🏼👌🏼 सर कमी शब्दात खुप समर्पक माहिती दिली आहे🙏🙏
ReplyDeleteवयाच्या केवळ तेराव्या वर्षी सुरु झालेला दिदींचा संगीतमय प्रवास आजतागायत आसमंत निनादत आहे.
आचार्य अत्रेंना लताबाईं बद्दल लिहायला सांगितल तेंव्हा अत्रे म्हणतात :-
केवळ लोखंडाच्या निफातून उतरल्या शाईनं,जाड्या भरड्या कागदावर लताला अभिवादन करणं म्हणजे एखादया अप्सरेच्या मृदुल चरणकमला खाली गोणपाटाच्या पायघड्या अंथरण्यासारखं आहे..
दिदींच्या प्रतिभेला साजेसं अभिवादन करायचं असेल तर....
पहाटकाळची कोवळी सुवर्ण किरणं दवबिंदूमध्ये भिजवून कमलतंतू च्या लेखणी ने फुलपाखराच्या पंखावर लिहिलेलं मानपत्र तिला गुलाब कळीच्या करंडकातून अर्पण करायला हवं ..लताचा आवाज हा मानवी सुष्ठीतला एक अद्भुत चमत्कार आहे.
साक्षात विधात्याला असा चमत्कार पुन्हा घडवता येणार नाही
श्रीकृष्णाच्या मुरलीचा साद ,उर्वशीच्या नुपुरांची रुणझुण आणि सरस्वतीच्या वीणेचा झंकार हे तिन्ही एकवटून विधात्याने आपल्या लताचा कंठ घडवला असेल .. सूर ,लय ,ताल ,सिद्धी आणि प्रसिद्धी या गोष्टी जिथे एकत्र येतात त्या जागेला आपण लता मंगेशकर अस म्हणावं...
...कारण संगीतातील सात सूर म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या लता मंगेशकर
खूप छान लिहिले आहेस.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteछान लिहिले आहे. दीदींबद्दल लिहिताना शब्द अपुरे वाटतात हेच खरं.
ReplyDeleteधन्यवाद
Delete